महाराष्ट्र आरोग्य पत्रिका हे गेल्या २० वर्षांपासून, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सर्वात नावाजलेले मासिक आहे. हे मासिक सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याव्दारे प्रकाशित केले जाते. (नोंदणीकृत क्रमांक – No.MAHMAR/2000/1736). आरोग्य शिक्षण, सामाजिक बदल व वर्तवणूक बदल संप्रेषण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व विविध योजनांची माहिती, तळागाळातील आरोग्य कर्मचा-यांपर्यंत पोहचवणे, ही या मासिकाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या विविध विषयांवर जसे कि, रोग व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय योजना, आरोग्य योजना, सार्वजनिक आरोग्य व वर्तवणूक बदल संप्रेषण, आरोग्याच्या शिक्षण पद्धती, आरोग्य कर्मचा-यांच्या यशोगाथा इ. पैलूंवर लेखमालिकांव्दारे प्रकाश टाकला जातो. आरोग्या व्यतिरिक्त सार्वजनिक स्वच्छता, पोषाहार, एकात्मिक बाल विकास योजना (आयसीडीएस), सुरक्षा तसेच आरोग्याशी संबंधित आंतरविभागीय विषयांवरच्या लेखांचाही यात समावेश असतो. लेखमालिकांचे लेखन, डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, आरोग्य सेवक/सेविका तसेच आरोग्य कर्मचारी यांच्याव्दारे केले जाते. याचबरोबर वैद्यकीय महाविदयालयातील त्या त्या विषयातील तज्ज्ञ, तसेच विद्यापीठ व संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञांचाही यात सहभाग असतो.