Menu Close

‘टेली-मानस’ मानसिक आरोग्यासाठीच्या सेवेची व्यापक जनजागृती

पुणे – मानसिक आरोग्य सेवेचा लाभ जनतेला मोफत मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली ‘टेली-मानस’ ही सुविधा २४x७ सर्वांना उपलब्ध करण्यात आलेली असून याद्वारे मानसिक आरोग्य विषयक मोफत सल्ला देण्यात येतो. ही सुविधा १४४१६ आणि 1800-8914416 या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करण्यात आली आहे.

या टेलिमेंटल हेल्थ सपोर्ट आणि नेटवर्किंग उपक्रमाबाबतच्या टोल फ्री क्रमांकाची व्यापक जनजागृती करण्याविषयी आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्याचा आरोग्य विभाग, प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या विविध संस्था आणि तज्ज्ञ यांच्या सहकार्याने राज्यभर ‘टेली-मानस‘या सेवेचा प्रसार होण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

टेली-मानस कधीही, कुठेही आणि सहज साध्य उपलब्ध होईल अशी सुविधा असल्यामुळे मानसिक आरोग्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरत आहे. मानसिक आरोग्य सेवा सहजसाध्य आणि वेळेवर देण्यासाठी मानसिक आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविण्यात येत आहे. जीवनात वाढत असलेल्या ताण-तणावामुळे अनेकांना मानसिक आरोग्य सेवेची आवश्यकता असते. संकटात असलेले कोणीही, परीक्षेचा ताण असलेले विद्यार्थी, कौटुंबिक समस्या, आत्मघाती विचार, एखाद्या पदार्थाचे व्यसन संबंधित समस्या, नातेसंबंध, स्मृती संबंधी समस्या, आर्थिक ताण त्याचप्रमाणे इतर कोणतीही मानसिक आरोग्य विषयक चिंता आणि समस्या असलेले कोणीही १४४१६ आणि 1800-8914416 या क्रमांकांवर संपर्क साधून मोफत सल्ला आणि समुपदेशन सेवा घेऊ शकतो.

यासाठी राज्य आरोग्य विभाग, प्रादेशिक मनोरुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर, समुपदेशक, मानसिक आरोग्य विषयक काम करणाऱ्या संस्थांमधील तज्ज्ञ यांचे ६० व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले असून त्यांच्या सहकार्याने आणि सहभागाने टेली मानस सेवेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्रसिद्धी साहित्याच्या माध्यमातूनच मानसिक आरोग्य व टेली मानस या सेवेविषयी लोकांमध्ये जनजागृती होणार आहे. या साहित्यामध्ये छोटे व्हिडिओ, क्रिएटीव, पोस्टर्स, बॅनर्स यांचा समवेश असणार आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त टेली- मेंटल हेल्थ सपोर्ट आणि ‘नेटवर्किंग’ (टेली-मानस) उपक्रम सर्व राज्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकार तर्फे २३ टेली-मेंटल हेल्थ सेंटर्स ऑफ एक्सलन्सचे नेटवर्क तयार करण्यात आले आहे. बेंगळुरू स्थित निम्हांस आणि आयआयआयटीबी या नोडल समुपदेशन संस्था असतील. या कार्यक्रमात २३ उत्कृष्ट टेली-मानसिक आरोग्य केंद्रांचे नेटवर्क समाविष्ट आहे. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेंगळुरू आणि नॅशनल हेल्थ सिस्टम रिसोर्स सेंटरदेखील तांत्रिक सहाय्य प्रदान करणार आहेत.

टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकाद्वारे कॉलर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिक त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकतात. . हा कॉल संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील टेली-मानस सेलकडे पाठवला जातो. टेली-मानस ही सेवा दोन-स्तरीय प्रणालीमध्ये चालविली जाते. या अंतर्गत टियर-१ मध्ये प्रशिक्षित समुपदेशक आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असलेल्या राज्य टेली मानस सेलचा समावेश आहे. टियर-२ मध्ये शारीरिक समुपदेशनासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (DMHP) वैद्यकीय महाविद्यालयाची संसाधने तसेच दृकश्राव्य समुपदेशनासाठी ई-संजीवनीच्या तज्ञांचा समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *