Menu Close

पोटदुखी, मळमळ, जुलाबाचा त्रास झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आरोग्य दूत

सार्वजनिक आरोग्य विभागाची तत्परता

पुणे – आषाढी वारी निमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ, जुलाब व अस्वस्थ वाटू लागल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य दूत आणि डॉक्टर त्यांच्या मदतीसाठी धावले. आरोग्य विषयक त्रास होऊ लागल्याने पंधरा वारकऱ्यांवर त्वरित प्राथमिक उपचार करून त्यांना बुधवारी (दि. ३ जुलै) सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य विभागाचे पुणे परिमंडळ उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी या घटनेची त्वरित दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून ते निरीक्षणाखाली आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथामागील दिंडी क्रमांक २४५ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज दिंडी लोहा यांचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कातोबा हायस्कूल दिवे येथे होता. या दिंडीत वारकरी ४५० व कामगार १५० एकूण ६०० भाविक सहभागी झालेलेआहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य दूताने आज दि. ०३ जुलैला दिंडीस भेट दिली असता काही वारकऱ्यांनी जुलाब, मळमळ होत असल्याचे सांगितले. त्यानंतर अशा एकूण १५ वारकऱ्यांना त्रास होत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर त्वरित प्राथमिक उपचार करून आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेव्दारे त्यांना ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे आणून त्यांचेवर उपचार करण्यात आले. त्यातील ९ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार देण्यात आले व ६ रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल करुन उपचार करण्यात येत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते देखरेखी खाली आहेत.

या दिंडीतील मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, माळशिरस व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने वारकऱ्यांची तपासणी केली असून त्यातील काही वारकऱ्यांना डोकेदुखी, सर्दी, किरकोळ जुलाब, पोटदुखी, गुडघेदुखी इ. लक्षणांचे रुग्ण आढळून आले व त्यांचेवर लगेच त्याच ठिकाणी उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती ठिक आहे.

या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा सर्वेक्षण अधिकारी यांनी दिंडीच्या मुक्काम स्थळी तसेच ग्रामीण रुग्णालय येथे भेट देवून याबाबतचा आढावा घेतला. दिंडीच्या ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा पाणी नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दिंडी मुक्काम स्थळी आरोग्य दूत व पथकामार्फत सर्वेक्षण करुन किरकोळ आजार असलेल्या २५ रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *