सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा | आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी
पुणे – आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यातून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंडींमध्ये सहभागी झालेल्या २ लाख १९ हजार ५०५ वारकऱ्यांना ४ जुलै पर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या विशेष उपक्रमाअंतर्गत आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
आषाढीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी विभागाचे ६,३६८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कार्यरत आहे. त्या अनुषगांने विभागाकडून दररोज आढावा घेतला जात आहे.
या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार असे सर्व कर्मचारी सेवा देणार आहेत. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ असणार आहे. यासह ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाब चा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी अॅम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात येणार आहेत, कारण आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने मोठी प्रत्येक ठिकाणी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स सज्ज असणार आहेत. जेणेकरून कोणालाही काही त्रास होत असेल तर त्याला त्वरित आरोग्य सेवा देता येणे शक्य होणार आहे.
या फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत असणार आहेत. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात येणार आहे. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय असणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवेची वैशिष्ट्ये –
- पालखी सोहळा २०२४ साठी एकूण मनुष्यबळ – ६,३६८
- प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – २५८
- वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४*७ उपलब्ध – ७०७
- दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ५८८५
- महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – १३६
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना – १३६
- पालखी मार्गावर आरोग्य दूत – २१२
- पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ९
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ८७
- आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.
- विविध माध्यमाद्वारे आरोग्य जनजागृती.