‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ | सार्वजनिक आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी !
पुणे – आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातून या दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत १४ लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी बजावली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली देहु-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातील पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी दि. १४ ते १८ जुलै 202४ या कालावधीत वाखरी, , गोपाळपुर , तीन रस्ता,65 ऐकर पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना आणि भाविकांना विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार करून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली. पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने मोठी प्रत्येक ठिकाणी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय १०२ व १०८ या अॅम्बुलन्सनेही पालखी मार्गावर सेवा दिली. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे. डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी वारीमध्ये सेवा दिली.
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. वारकरी आणि भाविकांमध्ये आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने उपक्रम राबविण्यात आले. यात आरोग्य दिंडी, चित्ररथ, आरोग्य दूत,संदेश टोपी, आरोग्य प्रदर्शनी, बॅनर्स/ स्टिकर्स, आरोग्य संदेश ऑडिओ व्हिडिओ, समाज माध्यमे, आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे संदेश प्रसारण, वृत्तपत्र जाहिरात, क्यूआर कोडचे वाटप, आरोग्य ज्ञानेश्वरी यांचा समावेश आहे.
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; तर आरोग्य मंत्री समाधानी !
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचे राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी पंढरपूर येथे भेट देऊन सेवे विषयी वारकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पंढरपूर येथे आरोग्य विभागाद्वारे आयोजित महाआरोग्य शिबिरांची देखील पाहणी केली व आरोग्य सुविधांची सविस्तर माहिती जाणून घेतली. महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक भाविकांनी लाभ घेतला असून मुख्यमंत्री महोदयांनी या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे आणि नियोजनाचे कौतुक केले. जास्तीत जास्त वारकऱ्यांना आरोग्य सेवा कशी पुरविली जाईल, यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची जबाबदारीने अंमलबजावणी केल्याबद्दल आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्ग आणि पंढरपूर येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवेची वैशिष्ट्ये –
- पालखी सोहळा २०२४ साठी एकूण मनुष्यबळ – ६,३६८
- प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – २५८
- वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४*७ उपलब्ध – ७०७
- दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ५,८८५
- महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – १३६
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना – १३६
- पालखी मार्गावर आरोग्य दूत – २१२
- पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ९
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ८७
- आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.
- विविध माध्यमाद्वारे आरोग्य जनजागृती.
- पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्या अंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने
तपासणी. - पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या किचनची तपासणी.
- १८६ टँकरद्वारे शुध्द पाणीपुरवठा तपासणी, पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, पाण्याच्या सर्व स्रोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैवकचरा विल्हेवाट.
- पालखी मार्गावर आरोग्यविषयक जनजागृतीसाठी समाज माध्यमात, डिजिटल, प्रिंट, होर्डिंग्ज तसेच ९ चित्ररथार्फत जनजागृती व प्रचार.
- १०८ रुग्णवाहिकेमार्फत अत्यावश्यक सेवा.
पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये पुरविण्यात आलेली आरोग्य सेवा –
- पंढरपूरमध्ये वाखरी, ३ रस्ता, गोपाळपूर, ६५ एकर या विविध ठिकाणी दि. १४ ते १८ जुलै २०२४ या कालावधीत महाआरोग्य शिबिरे (२४*७).
- पंढरपूरमधील ६५ एकर व गोपाळपूर येथे हॉस्पिटल सेटअप उभारण्यात आला.
- याशिवाय, शहरात विविध ठिकाणी ६ अतिदक्षता विभाग व १४ तात्पुरते ‘आपला दवाखाना’ कार्यान्वित .
- पंढरपूर ग्रामीण भागामध्ये विविध २६ ठिकाणी अतिदक्षता विभाग व तात्पुरते ‘आपला दवाखाना’ कार्यान्वित.
- एकूण १२१ आरोग्य दुतांमार्फत आरोग्य सेवा.
- वाखरी व ३ रस्ता येथील शिबिरामध्ये आभा स्कॅन आणि शेअर याअंतर्गत एकूण १,७२४ नोंदणी.
- महाआरोग्य शिबिरामध्ये विषयतज्ज्ञ, एमबीबीएस व पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर अधिकारी/कर्मचारी यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २,७१२ व भैरवनाथ शुगर्स व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (JSPM) स्वयंसेवक १,००० असे एकूण ३,७१२ मनुष्यबळामार्फत मोफत आरोग्य सेवा.
- महाशिबिराद्वारे नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग (क्षयरोग, कुष्ठरोग), कॅन्सर यांसारख्या रोगावर मोफत उपचार.
- ज्या वारकऱ्यांना शस्त्रक्रिया व सुपरस्पेशालिटी सेवेची आवश्यकता भासेल, त्यांची स्वतंत्रपणे यादी करून, सर्वांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.