Menu Close

चल उड जा रे पंछी…

मानसिक आजारावरती महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले पुण्याचे प्रादेशिक मनोरुग्णालय. या मनोरुग्णालयात ३० वर्षांपासून व्यवसायोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत असल्याने अनेक रुग्णांशी आमचा रोजचा संपर्क येतो, त्यांच्यावर उपचार होतात, रुग्ण बरे होऊन घरीही जातात, पण ज्यांना घरच नाही, कुणी आपले नाही… अशांचे काय ?

असाच एक मनोरुग्ण उस्मान (नाव बदलले आहे) नुकताच तारुण्यात पदार्पण केलेला. जेव्हा आला उस्मान मनोरुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झाला. एका अनाथालयात लहानपणापासून राहिलेला हा मुलगा अर्भकावस्थेतच घरच्यांनी त्यागलेला, शिक्षणात फार गती नाही, बुद्धिमत्ता जेमतेम, त्यात मानसिक आजाराची लक्षणे असलेला असलेला उस्मान. दाखल झाला तेव्हा संवाद नाही, थोडी अस्वस्थता, नवीन वातावरणाची भीती, त्यामुळे अस्वस्थ वागणारा आणि चिडचिड करणारा, शारीरिक स्थितीही खालावलेली, वजन कमी, रक्त कमी(अॅनेमिया), असा होता.

रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञांनी औषधोपचार सुरु केले, मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिकांनी आईच्या मायेने पाखर घालून जेवण, दिनक्रम व उपचारांवर बारीक नजर ठेवली अन परिचर संवर्गानी दैनिक स्वच्छता, वागणूक या गोष्टींवर लक्ष द्यायला सुरुवात केली. हळूहळू उस्मान प्रतिसाद देऊ लागला. शरीर स्वास्थ्य सुधारले, मानसिक उपचारांना प्रतिसाद मिळून वागणे, बोलणेही सुधारले. हळूहळू तो वॉर्डच्या बाहेर पडून रुग्णालयाच्या आवारात हिंडू-फिरु लागला व दैनंदिन जीवन क्रियेत रुळला.

असेच एके दिवशी उस्मान माझ्या व्यवसायोपचार विभागापुढे येऊन उभा राहिला. रुग्णालयाचा युनिफॉर्म, शर्टच्या वरुन कमरेला नाडी बांधलेली(पट्ट्यासारखा अन शर्टच्या आत असंख्य वस्तू भरलेल्या ,(मनोरुग्णांना बरेचदा बिनकामाच्या वस्तू बोचके करुन धरुन ठेवायची सवय असते). असे बोचके उस्मानच्याही शर्टमध्ये असायचे. बोलायचा नाही फक्त बघत उभा रहायचा अन् व्यवसायोपचार विभागात काम करणा-या रुग्णांना बक्षिस स्वरुपात मिळणा-या खाऊवर नजर ठेवायचा. त्याला काही वेळा आत बोलवायचे प्रयत्न केले, पण तो रागवायचा.

नंतर काही दिवसांनी बरे झालेले रुग्ण व बेघर रुग्णांसाठी पुनर्वसन कार्यक्रम चालू झाला. उस्मानच्या मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका व मानसोपचार तज्ज्ञांनी त्याला यात निवडले व त्याचा वॉर्ड बदलला (मनोरुग्णांना हा बदल पचवणे फार अवघड असते, विशेषताः मनाविरुद्ध). इथे त्याला मनासारखे हिंडता येईना, त्यामुळे तो परत अस्वस्थ झाला. इथे आमच्या विभागातील प्रशिक्षकाने त्याला रोज खाऊ देऊ, असे सांगितले. तू व्यवसायोपचार विभागात ये. त्या निमित्ताने तुला बाहेर पडता येईल. आधी नकार देणारा उस्मान लगेच तयार झाला.

व्यवसायोपचाव्दारे त्याची आकलन क्षमता, एकाग्रता, संवाद कौशल्य यात सुधारणा झाली व आधी कुठलेच काम न करणारा उस्मान हळूहळू सांगितलेली कामे करु लागला. त्याला कामात रस येऊ लागला. बघता बघता उस्मान फाईल मेकींग व स्क्रिन प्रिंटीग या ऑक्टिविटीजमध्ये मदतनीस म्हणून काम करु लागला. आता त्याचे राहणीमान, वागणूक व बोलणे सुधारले. विभागात त्याची तपासणी व मूल्यमापन केल्यावर असे लक्षात आले की तो मतिमंद असला तरी त्याचे मतिमंदत्व अतिशय सौम्य स्वरुपाचे आहे. घरी राहिला असता तर १० वी पर्यंत नक्की शिकला असता. कधी संधी न मिळाल्याने दुर्लक्षित राहिला.

त्याच्यावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली व त्याला टि-वेंडीग (ओ.पी.डी.मध्ये रुग्णांव्दारे चालवलेला स्टॉल) ला पाठवले. बघता बघता उस्मान स्टॉल नीट ठेवणे, स्टॉक नीट ठेवणे, गिऱ्हाईक निट सांभाळणे, कुणी पैसे चुकवत नाही ना इकडे लक्ष ठेवणे ही सगळी कामे स्वतंत्रपणे करायला शिकला. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला हिशोब जमत नाही हे तो स्वत: मान्य करायचा व सहकारी रुग्णाच्या मदतीने हिशोब ठेऊ लागला, इथे उस्मान टिमवर्क शिकला.

जसे जसे दिवस सरत गेले तसे त्याला वेध लागले रुग्णालयाबाहेर जाण्याचे. मी त्याला म्हणायची ’अरे कुठे पाठवू तुला’, इथून सोडू कसे देणार, पण तो दर थोड्या दिवसांनी माझी बाहेर सोय बघा’ असा तगादा लावायचा. इथे ’जगी ज्यास कोणी नाही’ चा प्रत्यय आला मला. विधी सेवा प्राधिकरण आणी भोई फाउंडेशनचे डॉ. मिलींद भोई मदतीला आले. पण त्यांचा निकष होता की रुग्णाला नातेवाईक हवे. मी जेव्हा मानसोपचार तज्ज्ञाच्या सूचनेनुसार पुनर्वसन योग्य रुग्णांची यादी केली, त्यात हा बसत नव्हता. पण मी जरा प्रयत्न वाढवले. आधी मनोविकार तज्ज्ञ व नंतर डॉ. भोईंना विनंती केली व त्यांना उस्मान कसा बाहेरच्या जगात रहायला योग्य आहे हे पटवून दिले.

शेवटी प्रयत्नांती परमेश्वर, भोई फाउंडेशनने समाजात पुनर्वसित केलेला पहिला बेघर मनोरुग्ण उस्मान एका हॉटेलमध्ये कामाला लागला. मालकाने त्याची राहण्या-खाण्याची व नियमित औषधोपचाराची जबाबदारी स्वीकारली. उस्मानचे रुग्णालयाबाहेरचे पुनर्वसन हा आम्हा सगळ्यांसाठी आनंद सोहळा होता. मनात थोडी साशंकता होती, दीर्घ काळ मनोरुग्णालयात राहिल्याने बाहेर रुळेल ना ?. पण इथे त्याने आम्हाला चकित केले. उत्तम रुळला अन मालक-मालकिणीने त्याला ईद साजरी करण्यासाठी स्वतःच्या घरी पाहुणा म्हणून नेले. सलाम आहे त्या मालकाला ज्याच्यामुळे उस्मानला घर, घरी सण साजरा करण्याचा आनंद अनुभवता आला. आज उस्मान समाजात मानाने परतला आहे. त्याला त्याचे आयुष्य मनासारखे जगण्याची संधी मिळाली आहे. त्याचे औषधोपचार आणि पुनर्तपासणी आमच्या तर्फे चालूच राहणार आहेत.

या प्रकियेतून आलेले अनुभव भावी अडचणींवर मात करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्हाला प्रेरणा देत राहतील. मनापासून आभार आहेत विधी सेवा प्राधिकरण अन भोई प्रतिष्ठानचे, ज्यांनी हे कार्य पूर्णत्वाला नेले. आता प्रतीक्षा आहे आम्ही उपचारांनी बरे केलेल्या अन समाजात जाण्यास उत्सुक असणा-या उस्मानच्या इतर मित्रांच्या पुनर्वसनाची. कामाच्या ठिकाणी मनावर घट्ट मानवतेच्या खुणा या उस्मानने कोरल्या व बंद उस्मानला उडण्याची संधी मिळाली. हा अनुभव आयुष्यभर माझ्या सोबतीला राहील.

डॉ. स्नेहल सस्तकर
व्यवसायोपचार तज्ज्ञ,
प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे
शब्दांकन @IEC Bureau

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *