Menu Close

चला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

जागतिक आरोग्य दिनानिमित्त फिट महाराष्ट्र उपक्रमाला सुरुवात

मुंबई, दि. ७ : आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करुन निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका आणि मेडस्केप इंडिया यांच्या वतीने संकल्प निरोगी महाराष्ट्राचा (फिट महाराष्ट्र) उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमात संकल्प निरोगी महाराष्ट्राचा उपक्रमाचे पोस्टर अनावरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना कालावधीत अतिशय चांगले काम केले. मात्र अद्यापही आपल्याला आरोग्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करायच्या आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.

आरोग्याचा आणि विकासाचा एकमेकांशी संबंध आहे. कारण आरोग्यदायी व्यक्तीच राज्य आणि देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ शकतो. आपण क़ोरोनाच्या दोन लाटांवर मात केली. त्या काळात लावून घेतलेल्या स्वच्छतेच्या सवयी काळजीपूर्वक जपल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्य समस्या उद्भवत आहेत. यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार घेतला पाहिजे. तणावमुक्त जगण्यासाठीही विशेष प्रयत्न करायला हवेत. शरीराबरोबरच मनाचे आरोग्य जपण्यासाठीही विशेष प्रयत्न करायला हवेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करून पुढे आला आहे. आता आपण निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करीत आहोत. यासाठी सर्व नागरिकांचे सक्रिय सहभाग आवश्यक आहे. कारण नागरिकांच्या जोरावरच आपण कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. त्यामुळे फिट महाराष्ट्र संकल्पना नागरिकांच्या जोरावरच साध्य होऊ शकेल, असे सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव निलीमा करकेट्टा, आरोग्य आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ साधना तायडे, उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक डॉ. पद्मजा जोगेवार, उपसंचालक डॉ कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ. संजीव जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *