मुंबई, दि. ९ : सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2030 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. त्यात या क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, बंदरे, जहाज बांधणी व जल वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले.
राष्ट्रीय आयुष मिशन
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहकार्याने केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आयुष मिशनच्या क्षेत्रीय आढावा बैठकीचे आयोजन सहारा स्टार हॉटेल येथे करण्यात आले. या बैठकीला केंद्रीय आयुष मंत्री श्री. सोनोवाल मार्गदर्शन करीत होते.
यावेळी केंद्रीय आयुष, महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री राजेश कोटेचा, अतिरिक्त सचिव तथा आयुष विभागाचे आर्थिक सल्लागार जयदीपकुमार मिश्रा, केंद्रीय सहसचिव कविता गर्ग, राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, या राज्यांचे आणि दादरा व नगर हवेली, दीव दमण, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचे आयुष व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्राचीन व आधुनिक उपचार
केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयानेच आयुष मिशन पुढे जाणार असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल म्हणाले की, राष्ट्रीय आयुष्य मिशन अंतर्गत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनांना पुढाकार घ्यावा लागेल. राज्याच्या सहकार्यानेच आयुष मिशन मजबूत होईल. प्राचीन व आधुनिक उपचार पद्धतीच्या समन्वयातूनच भविष्यात येणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होणार आहे. कोविड काळात कोविडचा संसर्ग नियंत्रित करण्याकरिता आयुषमधील उपचार पद्धतींचा चांगला उपयोग झाला. जगात ‘आयुष’चे महत्त्व त्या काळात अधोरेखित झाले.
देशात 900 पेक्षा जास्त स्टार्ट अप सुरू
जागतिक आरोग्य संघटनेने भारतात त्यांचे विस्तार केंद्र सुरू केले आहे. भारत हा जगातील असे विस्तार केंद्र सुरू होणारा पहिला देश आहे. जगात विविध देशांमध्ये पारंपरिक उपचार पद्धती आहेत. मात्र, भारतातील पारंपरिक उपचार पद्धत जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरली आहे. आयुष क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीच्या विविध संधी आहेत. या क्षेत्रात देशात 900 पेक्षा जास्त स्टार्ट अप सुरू झाले असून अनेक उद्योगही सुरू झाले आहेत. ‘एम्स’ (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स)पासून ते गाव पातळीपर्यंत आरोग्य संस्थांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा आयुषच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.
जनतेचा सहभाग वाढविणे गरजेचे
यापुढे ‘एम्स’मध्ये आयुषला समर्पित एक विभाग कार्यरत असणार आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मानवी शरीराला विविध आजारांपासून संरक्षण देण्याचे महत्त्वाचे काम आयुष मिशन करणार आहे. आयुष मधील जनतेचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. जन सहभागातूनच आयुष मिशन यशस्वी होईल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल यांनी व्यक्त केला.
आयुष मिशनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची
याप्रसंगी केंद्रीय आयुष, महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. कालूभाई म्हणाले की, केंद्रीय आयुष मिशन यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचा समन्वय महत्त्वाचा आहे. राज्य सरकारांच्या सहकार्याशिवाय मिशन यशस्वी होऊ शकत नाही. मिशन अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदींचा चांगला उपयोग राज्यांनी करावा. यामधून आरोग्य क्षेत्रासाठीच्या दर्जेदार पायाभूत सोयी सुविधा निर्माण कराव्यात. ही आढावा बैठक आयुष मिशनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय सहसचिव कविता गर्ग यांनी सादरीकरणाद्वारे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमधील आणि दादरा व नगर हवेली, दीव दमण, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील आयुष मिशनच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
आयुष विभागाचे केंद्रीय सचिव पद्मश्री राजेश कोटेचा यांनी प्रास्ताविकात आयुष विभागाची ही चौथी आढावा बैठक असल्याचे सांगत सध्या देशात २५ हजार आयुष चिकित्सक काम करत असल्याची माहिती दिली. देशात १४७ आयुष हॉस्पिटल असून ८ कोटी ४२ लाख रुग्णांनी ‘हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर’मधून लाभ घेल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान योगा प्रात्यक्षिके करण्यात आली. आभार प्रदर्शन केंद्रीय सहसचिव सुरेशकुमार यांनी केले.