Menu Close

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचा शुभारंभ

नाशिक : पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या (सीएचओ) दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचा नाशिक येथे आज (दि. ६ ऑक्टोबर) शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झाला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती लावून सहभागी झालेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

आरोग्य सेवांचा आढावा

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्यात आरोग्य विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या या दोन दिवसीय परिषदेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या राज्य आणि संघराज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी सहभागी झाले आहेत. या परिषदेला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी, आयुष मंत्रालयाचे अधिकारी, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राला मदत करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, आयुष संचालक आदी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

नव्याने सर्कल वाढविण्याची गरज

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्यात आरोग्य विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला. प्रा. डॉ. सावंत म्हणाले, “आरोग्य विभागामार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राज्यात उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहेत. राज्यात सध्या आठ सर्कलद्वारे आरोग्य सेवा पुरविली जाते. राज्याची एकूण लोकसंख्या लक्षात घेता आणि सर्व लोकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी या सर्कलचे विभाजन करून नव्याने सर्कल वाढविण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने आयुष्मान भव: अभियानातील योजनांची राज्यात आधीपासूनच अंमलबजावणी सुरु केली होती. त्यामुळे या अभियानातील योजनांचे काम जोरात सुरु असून त्याला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे.”

५ कोटी ४८ लाख लोकांनी घेतला लाभ

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल म्हणाले, “आपल्या देशात ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या लोकांना चांगली आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक असून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. त्यामुळे सीएचओवर ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा पुरविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत देशात सुमारे २५ कोटी ३६ लाखांपेक्षा अधिक लोकांचे आयुष्मान कार्ड तयार करून त्यांना ते प्रदान करण्यात आले आहेत. त्यापैकी ५ कोटी ४८ लाख लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे.अवयवदान हे श्रेष्ठतम दान असून जास्तीत जास्त लोकांनी ते करावे यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.”

…समुदाय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात

परिषदेमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या. “समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या सक्रिय सहभागाद्वारे देशात आयुष्मान भारत आरोग्य सेवा केंद्रांमध्ये २ लाख ८५ हजार आरोग्य मेळावे आणि समुदाय आरोग्य केंद्रांमध्ये १०,५१० वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी सुविधा निर्माण झाली. सार्वजनिक आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पुरविण्यात समुदाय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयुष्मान भारत आरोग्य सेवा केंद्राद्वारे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि पुनार्वसनात्मक सेवा अशा तिन्ही स्तरावर आरोग्य सेवा पुरविली जाते. सध्या चालू असलेल्या आयुष्मान भव: अभियानाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. या अभियानामध्ये अवयवदान आणि रक्तदान शिबिरांचे मोठ्या संख्येने आयोजन करण्यात आले असून या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. देशातील इतर राज्यांनीही अवयवदान आणि रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आरोग्य सेवेत आपले योगदान द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *