मुंबई : महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून यासाठी आज शासनाने व्यापक पाऊल टाकले आहे. यात राज्य शासनचा सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले.
राज्यातील आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावेळी आरोग्यावरील गुंतवणूक, पदभरती याबाबत उपयुक्त सुचना दिल्या. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृती दलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक वैद्यकीय शिक्षण डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आयुक्त आरोग्य सेवा, धीरज कुमार तसेच इतर सचिव उपस्थित होते.
या बैठकीत पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
- वर्ष २०३५ पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी एक आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमणार
- येत्या पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने नियोजन करून नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या जोडीने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबत आराखडा तयार करण्यात येणार.
- आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणे याची तत्काळ खरेदी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, यासाठी जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
- वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न झाल्याने १३ जिल्हा रुग्णालये बंद झाली आहेत, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे १२ जिल्हा रुग्णालये हस्तांतरित करण्यात येणार आहेत, हे लक्षात घेता २५ जिल्ह्यांमध्ये नवीन अद्ययावत आणि सर्व सुविधा असलेली जिल्हा रुग्णालये उभारणार, तसेच सध्या वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या सर्व जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करणार, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्या समितीला पुढील १५ दिवसांत आराखडा तयार करण्याचे आदेश
- १४ जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयांना देखील बळकट करण्याचे आदेश
- मोठ्या शस्त्रक्रियांसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांत सुविधा असल्या पाहिजेत, प्राथमिक उपकेंद्र, उप जिल्हा रुग्णालये, सक्षम करून शहरातील शासकीय आरोग्य यंत्रणांवर ताण येणार नाही याची काळजी घेण्याची सूचना
- राज्याचा सार्वजनिक आरोग्यावरील खर्च वाढविण्याची गरज, आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक झाली पाहिजे, या दृष्टीकोनातून पंधराव्या वित्त आयोगाने दिलेला निधी पुढील मार्चपर्यंत खर्च करण्याचा निर्णय, आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील अपेक्षित खर्च देखील झाला पाहिजे याबाबत एकमताने निर्णय.
- रुग्णवाहिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य संस्थांचे बांधकाम, वैद्यकीय उपकरणे आदींसाठी ८३३१ कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीसह मंजूर, यासह १२६३ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीची आवश्यकता .
- हुडकोकडून १४१ आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी मंजूर झालेला ३९४८ कोटी निधी वेळेत खर्च करणार, तसेच आशियाई विकास बँकेकडून ५१७७ कोटींचे कर्ज नवीन आरोग्य संस्थांसाठी मिळणार
- महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणावर तातडीने भारतीय प्रशासन सेवेतील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर ८ पदांवर अधिकारी नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, याशिवाय आवश्यक ४५ पदांची निर्मिती करण्यासाठी आरोग्य विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश.
- सध्या सार्वजनिक आरोग्य विभागात ३८ हजार १५१ पदे यापूर्वीच भरण्यात आली असून १९ हजार ६९५ रिक्त पदांची भरती टीसीएसमार्फत सुरू, पुढील महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील यासाठी तातडीने पावले उचलणार .
- प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तांत्रिक पदांसाठीची अनुकंपा पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी यासाठी निर्देश.
- राज्यात आरोग्य विभागाची ८ परिमंडळे (सर्कल्स) आहेत. वाढती लोकसंख्या आणि रुग्णांचा ताण लक्षात घेता आणखी नवी ९ परिमंडळ निर्माण करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तातडीने सादर करावा.
- ग्रामीण आणि दुर्गम भागात टेलीमेडीसीनचा उपयोग वाढविण्यावर भर, यामुळे इतर ठिकाणच्या आरोग्य यंत्रणांवर येणारा ताण कमी होईल .
- जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जिल्हा रुग्णालये तसेच आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ग्रामीण व इतर शासकीय रुग्णालये यांना नियमित भेटी द्याव्यात, या भेटींमुळे रुग्णालय व्यवस्थापनात निश्चितच फरक पडणार असून रुग्णालयात उत्तम स्वच्छता राहील, पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सोय असेल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
- वाढत्या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ, याबाबतीत देखील प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, रक्तदान शिबिरे घ्यावीत, रक्त पेढीना भेटी द्याव्यात आणि जनजागृतीही करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.