मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडावियाजी यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग अंतर्गत सुरू असलेल्या विविध योजना व कार्यक्रम बाबतीत सविस्तर चर्चा केली.
आरोग्य विभागाने गेल्या एक वर्षाच्या कालावधीत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम जनसामान्यांच्या सेवेसाठी राबविले आहेत. यामध्ये माता सुरक्षित घर सुरक्षित, जागरूक पालक, सुदृढ बालक, सुंदर माझा दवाखाना, महाआरोग्य शिबिरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अनुदान पाच लाखापर्यंत वाढविणे असे विविध लोककल्याणकारी निर्णय घेऊन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे, याची माहिती पुस्तिका माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडावियाजी यांना भेट दिली.
यावेळी महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मंडावियाजी यांनी दिले.