पुणे – देशातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयुष्मान भव: ही योजना आखली असून, येत्या १३ सप्टेंबरपासून ‘आयुष्मान भव:- आयुष्मान आपल्या दारी ३.0’ योजनेचा शुभारंभ होत आहे. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर एकाच वेळी या योजनेला सुरुवात होणार आहे. मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर या योजनेचा शुभारंभ होणार आहे.
राज्यात १७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘आयुष्मान भव:’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘आयुष्मान भव:’ या योजनेचे तीन मुख्य घटक असून, ‘आयुष्मान आपल्या दारी ३.0’ या उपक्रमामध्ये सर्व जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. ‘आयुष्मान सभा’ उपक्रमामध्ये आरोग्य विषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आयुष्मान कार्ड व आभा कार्ड याबाबत जनजागृती, आरोग्यवर्धिनी सिकलसेल, लसीकरण व क्षयरोगाबाबत जागृती करण्यात येणार आहे. तर ‘आयुष्मान मेळावा’ अंतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकरचे कॅन्सर, कुष्ठरोग, नेत्रचिकित्सायाविषयी तपासणी करण्यासाठी सामुदायिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या मोहिमेदरम्यान रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहीम व 0 ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची अंगणवाडी आणि शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
आयुष्मान ग्राम अंतर्गत सर्व गरजू लोकाना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कार्डसह आभा कार्ड आणि आरोग्य तपासणीची सेवा पुरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत कोणत्याही गावात गरजू लोकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सर्व सेवांचा लाभ मिळत असेल तर त्या गावाला आयुष्मान ग्राम घोषित करण्यात येईल आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.