Menu Close

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयाचा कायापालट रुग्णांसाठी वरदान

सामान्य माणसाला संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय आरोग्य सेवेसाठी पर्याय उपलब्ध नव्हता; परंतु आता सार्वजनिक आरोग्य विभागाने अद्ययावत केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कायापालट झालेला असून या ठिकाणी सामान्य माणसांसाठी मोफत आरोग्य सुविधा अत्याधुनिक व सक्षम झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून द्विस्तरीय आरोग्य सेवेचा कायापालट झाला असून या रुग्णालयाला “कायाकल्प” गुणवत्ता पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून अधिक सक्षम देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कायापालट झाला असून मराठवाडा क्षेत्रातील रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आरोग्य सेवेसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. आज रोजी जवळपास 1600 रुग्ण या ठिकाणी बाह्यरुग्ण विभागात सेवेसाठी येत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे तसेच या रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ व रुग्णालयातील डॉक्टर व सर्व स्टाफ, टीम यांच्या समन्वयामुळे व अथक परिश्रमामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय अधिक लोकाभिमुख होत असून आधुनिक आरोग्य सुविधा जनसामान्यांना उपलब्ध झाल्या आहेत. प्रगत वैद्यकीय सुविधा या रुग्णालयाच्या माध्यमातून जनसामान्यांना अधिक दर्जेदार मिळत आहेत. मराठवाडा परिसरात हे रुग्णालय “मिनी घाटी” म्हणून रुग्णांचा आधारस्तंभ म्हणून उदयास आले आहे.

या रुग्णालयात आधुनिक यंत्रसामग्री व विशेषतज्ज्ञ उपलब्ध असून यात खालील विभागांचा समावेश आहे.

बाह्य रुग्ण विभाग:
या विभागात विविध आजारांचे निदान, तपासण्या व उपचार होत असून रोज जवळपास 1600 च्या वर रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत.

अति दक्षता कक्ष:
या विभागा अंतर्गत गंभीर रुग्णांवर उपचार करण्याकरिता अतिदक्षता कक्ष कार्यरत असून आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बाल आरोग्य व विशेष नवजात अर्भक कक्ष:
कमी वजनाच्या अथवा अपुऱ्या दिवसांच्या जन्मलेल्या बालकांची निगा अतिदक्षता कक्षात ठेवून केल्यास बाल मृत्यूचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करणे शक्य असते. यासाठी या रुग्णालयात नवजात बालकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत व त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.

बालकांसाठी डीईआयसी सेंटर :

आरोग्य समस्या असणाऱ्या सहा वर्षापर्यंतच्या बालकांना या ठिकाणी भरती करून विशेष काळजी घेण्यात येते. जेणेकरून बालकांमध्ये संभाव्य धोके टाळता येतात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मनोरंजनात्मक व विकासात्मक पद्धतीने या ठिकाणी उपचार करण्यात येतात.

सी.टी.स्कॅन:
रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होणाऱ्या रुग्णांमधील जखमी रुग्णांमध्ये डोक्याला मार लागलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. अशा रुग्णांची तातडीने सी.टी.स्कॅन चाचणी करून त्यांच्यावर वेळीच उपचार केल्यास जास्तीत जास्त रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य असते. यासाठी या जिल्हा रुग्णालयात ही आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोनोग्राफी सुविधा:
पोटातील रोगाचे अचूक निदान करण्याकरिता जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे व हे यंत्र हाताळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे.

डायलिसिस सुविधा:
किडनी आजारावरील रुग्णांची काळजी घेण्यासाठी डायलिसिसची सुविधा या रुग्णालयामध्ये उपलब्ध असून डायलिसिससाठी लागणारी आधुनिक मशीन व सुविधा तसेच तज्ज्ञ या ठिकाणी उपलब्ध झाले असल्यामुळे ही सुविधा रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

मनोविकृती कक्ष:
मानसिक आजार, निदान व उपचार यासाठी या रुग्णालयात मानसिक आरोग्य तपासण्या, निदान व उपचार यांची सुविधा तज्ज्ञ व प्रशिक्षित स्टाफ मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हिमोफिलिया “डे केअर सेंटर”:
हिमोफिलिया या आजारावरती उपचार करण्यासाठी या रुग्णालयात डे केअर सेंटर स्थापन झाले असून थॅलेसेमिया, हिमोफिलिया व सिकलसेल या आजारांच्या रुग्णांसाठी हे केंद्र वरदान ठरत आहे मराठवाडा, खानदेश व विदर्भाचा काही भाग या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत .

आधुनिक पॅथॉलॉजी लॅब :
या रुग्णालयात आधुनिक अशी पॅथॉलॉजी लॅब तयार असून प्रशिक्षित डॉक्टर व तंत्रज्ञ यासाठी उपलब्ध झाले असून या गुणवत्तापूर्ण सेवांचा लाभ जिल्हा व परिसरातील रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे तसेच इतर ठिकाणी लागणाऱ्या रक्त विषयक गरजांसाठी ही लॅब वरदान ठरत आहे.

ऑर्थोपेडिक, फिजियोथेरपी विभाग:
ऑर्थो व फिजिओथेरपी च्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत.

मोफत नेत्र सेवा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया:

या रुग्णालयात 20 खाटांचा कक्ष असून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारे अत्याधुनिक मायक्रोस्कोप व सुविधा या ठिकाणी उपलब्ध असून मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

स्त्रीरोग व प्रसूती विभाग:
स्त्री रोग व प्रसूती विभागात मॉड्युलर ओटी, आधुनिक प्रसूतिगृह उपलब्ध असून या ठिकाणी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया या विभागाचे तज्ज्ञ करीत असून याचा लाभ या परिसरातील रुग्णांना मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो.

कर्मचाऱ्यांची मनोबल उंचावण्यासाठी विशेष उपक्रम:
कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व रुग्णालयातील स्टाफ यांचे मनोबल उंचावण्यासाठी व गुणात्मक पद्धतीने आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचाऱ्यांचा गौरव व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन या रुग्णालयाच्या वतीने केले जात आहे .यामुळे कर्मचाऱ्यांचा सहभाग रुग्णालयीन सेवेत वाढतो आहे.

दानशूर व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग :
दानशूर व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी व रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या मार्फत ऑक्सिजन प्लांट तसेच इतर साहित्यही या माध्यमातून उपलब्ध होत आहे. यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे.

परिचारिका प्रशिक्षण केंद्र:
या रुग्णालयाच्या अंतर्गत प्रशिक्षण केंद्र उपलब्ध असून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या रुग्णालयाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षण व अनुभव मिळत आहे. त्यामुळे सक्षम मनुष्यबळही आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होत आहे.

*वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संधी: *
वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षित डॉक्टरांनाही या ठिकाणी वैद्यकीय अनुभव घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी येथे प्रशिक्षणही घेत आहेत.

वर्षभरातील या रुग्णालयाचे कार्य :
या जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 पर्यंत 2,36,510 रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागात उपचार करून घेतला आहे. तर या काळात 5823 रुग्णांनी अंतर रुग्ण सेवेद्वारे उपचार सेवा घेतली आहे.

मराठवाड्यातील संभाजी नगरचे जिल्हा रुग्णालय सामान्य माणसासाठी दिलासादायक आरोग्य सेवा केंद्र म्हणून उदयास आले असून, ग्रामीण भागातून संदर्भित होणाऱ्या रुग्णांना, सामान्य व गरीब नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून लोकमान्य व लोकाभिमुख होत आहे. हे विशेष सार्वजनिक आरोग्य विभागाचे हे जिल्हा रुग्णालय सक्षम व विकसित झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणारा ताण यामुळे कमी झाला आहे.

“सार्वजनिक आरोग्य सेवेला द्विस्तरीय आरोग्य सेवेच्या दृष्टीने अधिक सक्षम, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात अशा रुग्णालयांची गरज असल्यामुळे सामान्य रुग्णालयातील सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक विभागातील तज्ज्ञांना जबाबदारी वाटून देण्यात आली असून या रुग्णालयाचा कायापालट करण्याकडे आम्ही विशेष लक्ष देत आहोत. या रुग्णालयाला गुणवत्तेच्या “कायाकल्प” पुरस्काराने ही गौरविण्यात आले आहे.”

  • डॉ. दयानंद मोतिपवळे
    जिल्हा शल्यचिकित्सक ,
    जिल्हा रुग्णालय, संभाजी नगर.

“जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना संदर्भित केल्यानंतर विशेष सेवा मिळण्यासाठी या रुग्णालयाची मोठी मदत होत असून त्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, तंत्रज्ञान व आरोग्य सुविधा गरीब व गरजू रुग्णांना देण्यासाठी या रुग्णालयाचा कायाकल्प झाला आहे व या रुग्णालयाला या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. रुग्णांचे आशीर्वाद आणि प्रेरणा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे”

  • डॉ. पद्मजा सराफ
    अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक,
    जिल्हा रुग्णालय, संभाजीनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *