Menu Close

प्रतिबंधात्‍मक उपचारासाठी अनेक व्‍याधींवर नियमित योग परिणामकारक – धीरज कुमार, आरोग्‍य सेवा आयुक्‍त

पुणे : आरोग्‍य विभागाच्‍या वतीने आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक आरोग्‍य दिनाच्‍या निमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी आरोग्‍य भवन येथे करण्‍यात आले होते. सदरील राज्‍यस्‍तरीय कार्यक्रमाचे उदघाटन आरोग्‍य सेवा आयुक्‍त धीरज कुमार (भा.प्र.से.) यांचे हस्‍ते संप्‍पन्‍न झाले. याप्रसंगी वित्‍त संचालक जयगोपाल मेनन, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, तुळशीदास सोळंके, सुभाष बोरकर, डॉ. विजय बाविस्‍कर, डॉ. शोभना तेहरा, डॉ. दुर्योधन चव्‍हाण, डॉ. प्रकाश पाडवी इत्‍यादी अधिकारी तसेच आयुक्‍तालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्‍वलनाने झाली. यावेळी धन्‍वंतरी स्‍तवन व आयुष गीत सादर करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या शुभहस्‍ते यावेळी ‘’सचित्र योगक्रम’’ पुस्तिकेचे अनावरणदेखील करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सहायक संचालक डॉ. सुभाष घोलप यांनी करताना जागतिक योग दिवसाची पार्श्‍वभुमी व महत्‍व विषद केले.

यंदाच्या योग दिनाचे घोषवाक्‍य “हर आंगन योग” असे असून ‘योगा फॉर वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेवर यंदाचा ९वा जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. अध्‍यक्षीय भाषणात आयुक्‍त धीरज कुमार यांनी मानवी जिवनात आयुर्वेद व योगाचे महत्‍व सांगताना असंसर्गजन्‍य आजारांचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक असल्‍याचे विषद करत योगासारख्‍या अखर्चिक व किमान संसाधनांची आवश्‍यकता असलेल्‍या प्रतिबंधात्‍मक थेरपीचा वापर होणे आवश्‍यक असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. मेडीटेशन, योग यासारख्‍या थेरपींमध्‍ये सातत्‍य व नियमितपणा ठेवला तर अनेक आजारांपासून दुर राहणे शक्‍य असल्‍याचे मत व्‍यक्‍त करत परदेशामध्‍ये ज्‍या प्रमाणात योग थेरपीचा वापर केला जात आहे. त्‍या प्रमाणात आपल्‍या देशात त्‍याचा प्रसार होत नसल्‍याची खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. शारीरीक आजारांव्‍यतिरीक्‍त क्रोध, मानसिक व्‍याधींवर नियंत्रण मिळवण्‍याचे सामर्थ्‍य योगामध्‍ये असल्‍यामुळे सर्वांनी आपल्‍या दिनचर्येतील काही वेळ योगासाठी व्‍यतीत करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी आपल्‍या मनोगतातून दिला.

कार्यक्रमाच्‍या उदघाटन समारंभानंतर ‘ताण तणावापासून मुक्‍तीसाठी योग’ या विषयावर लोणवळयाच्‍या कैवल्‍यधामचे सहायक प्राध्‍यापक डॉ.सतीश पाठक (एम.एस.), ‘असांसर्गिक रोगांमधील योगाचे महत्‍व’या विषयावर कैवल्‍यधामचे प्राध्‍यापक डॉ. शरदचंद्र भालेकर (एम.एस.)आणि ‘अष्‍टांग योग-समज/ गैरसमज’ या विषयावर सायन येथील आयुर्वेद महाविदयालयाचे प्राध्‍यापक डॉ. गोरक्षनाथ आव्‍हाड यांची व्‍याख्‍याने पार पडली. तसेच डॉ. साक्षी हडप व डॉ. निकेश अंधारे यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्‍यक्षिकेदेखील करवून घेतली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रसाद भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुभाष घोलप यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी आयुष विभागाचे राज्‍य कार्यक्रम व्‍यवस्‍थापक डॉ. प्रशांत भोईर, कार्यक्रम अधिकारी डॉ. वर्षा वसु, श्रीमती प्रियंका सुर्यवंशी, श्री प्रकाश दळवी यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *