Menu Close

राज्यातील सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी तसेच नूतनीकरण आता ॲानलाईन होणार

राज्यातील सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी तसेच नूतनीकरण आता ॲानलाईन होणार आहे. यासाठी पीसीपीएनडीटी वेबपोर्टल वापरण्यात येणार असून महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.

प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी)च्या ॲानलाईन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि अधिक पारदर्शकता येणार आहे. या ॲानलाईन सुविधेमुळे केंद्रधारकांना कार्यालयात हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील कुपरेज येथे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या ॲानलाईन वेबपोर्टलचे लोकार्पण झाले. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदिप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॅा. रामास्वामी, संचालक अर्चना पाटील, सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्यात मुलांमुलींची संख्या समान राहावी यासाठी राज्य शासन प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. महाआयटीच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी व नूतनीकरणासाठी आरोग्य विभागाने ॲानलाईन पोर्टल सुरू केले आहे. ज्यांना नोंदणी किंवा नूतनीकरण करावयाचे आहे त्यांनी या ॲानलाईन सुविधेचा वापर करावा. यामुळे आजतागायत प्रलंबित प्रकरणांची माहिती मिळवून निकाली काढण्यास मदत होणार आहे. या ॲानलाईन सुविधेचा चांगला उपयोग करून केंद्रांच्या नोंदणी आणि नुतनीकरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे.

ही नवीन प्रणाली विकसीत केल्याबद्दल आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आरोग्य क्षेत्रात उपयुक्त ठरतील असे नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य विभागाशी संबंधित इतर सेवा एका प्लॅटफॅार्मवर याव्यात यासाठीही एकत्रितपणे काम करणार असल्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

केंद्र शासनाच्या ईज ॲाफ डुईंग या कार्यक्रमांतर्गत पीसीपीएनडीटी कायद्यानुसार केंद्राची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी/नुतनीकरण करण्यासाठी कार्यप्रणाली विकसीत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार पीसीपीएनडीटी कायद्यांअंतर्गत केंद्राची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी/ नुतनीकरणासाठी http://pcpndtonlineregistration.maharashtra.gov.in ही कार्यप्रणाली महाऑनलाईन (महा-आयटी) या संस्थेच्या मदतीने विकसीत करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *