आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना अद्यावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातली पहिल्या नवजात शिशु रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज मुंबईत झाले.
सर्व साधनसामुग्री, अद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेल्या ५ रूग्णवाहिका राज्यातील आदिवासी भागातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ या आदिवासी भागातील शासकीय रुग्णालयांत दाखल होणार आहेत.
रुग्णवाहिके मार्फत वेळेत व वेळीच उपचार देऊन इतर आरोग्य संस्थेत संदर्भित करेपर्यंत शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल.
नवजात शिशुंमधील श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार, सेप्सीस, न्यूमोनिया, जलशुष्कता, हायपोथर्मिया, जंतूसंसर्ग यासारख्या गंभीर आजारांपासून मृत्यु टाळण्यासाठी मदत होईल.
नवजात शिशुला संदर्भ सेवा देतांना कंगारु मदर केअर (केएमसी) या सारख्या उपचार पद्धतीचा उपयोग करुन शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल.
नवजात शिशु रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सीजन सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असणारे Suction Machine, AMBU Bag, ०२ Oxygen Hood, Cylinder, Continuous Positive Airway Pressure (CPAP), Neonatal Ventilator यंत्रसामग्री व उपकरणे, औषधसाठा व प्रशिक्षित मनुष्यबळ असल्याने राज्यातले दरवर्षी श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजारांमुळे होणारे अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
या नवजात शिशु रुग्णवाहिका आदिवासी जिल्हयातील तालुक्याच्या उप जिल्हा रुग्णालय / ग्रामिण रुग्णालयाच्या ठिकाणी कार्यरत असतील.
सद्यस्थितीत जिल्हय़ातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामधील नवजात शिशुं कार्यरत ठेवण्याकरिता नियुक्त करण्यात येईल. तसेच सदर नवजात शिशुं करीता २०२२-२३ मध्ये १५ वैद्यकिय अधिकारी व १० वाहन चालकांच्या पदाची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आलेली आहे. नवजात शिशुंसाठी नियुक्त करण्यात येणा-या वैद्यकिय अधिकारी व वाहन चालकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
तालुक्याअंतर्गत येणा-या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रातील कॉल आल्यास नवजात शिशु रुग्णवाहिका अर्भकांना संदर्भ सेवा पुरविण्यात येईल. त्याकरिता १०२/१०८ या टोल फ्री नंबरचा उपयोग करण्यात येईल.