Menu Close

मानवतेतील ममता…

समाजात परस्परावलंबन हा मानवतेच्या दृष्टीने मुलभूत असा घटक आहे. अनेक व्यवहार हे एकमेकांवर व मानवतेवर, मदतीवर अवलंबून असतात.

समाजातील व्यक्ती जेव्हा परस्परांना मदत किंवा सहाय्य करतात तेव्हा सामाजिक निर्मितीचा आधार तयार होतो. त्याने समाजाच्या इतर सदस्य बरोबर सहकार्य केले तर अनेक कठीण प्रसंग मदतीने हाताळले जाऊ शकतात ममतेच्या सामाजिक आंतरक्रिया हे समाज संबंधाचे मूलभूत तत्व असून आंतरक्रिया हे समाजाचे मूळ आहे.यातील आपलेपणा मानवा विषयी असणारी ममता या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

सामाजिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी व्यक्ती ममत्त्व भावनेने प्रभावित होऊन अनेकांना कठीण प्रसंगी मदत करीत असते आणि हाच मानवतेचा खरा धागा होय.

मेळघाट हा तसा अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवणे हे आव्हानात्मक असे काम आहे याचा अनुभव ममता सोनकर या समुपदेशक महिलेला आला. या भागात सेवा देणाऱ्या मनता यांचा संपर्क दांडगा आहे. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या अनेकांना त्यांच्या ममत्व भावनेचा अनुभव आलेला आहे. रुग्णांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा त्यांचा प्रयत्न मानवतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा राहिला आहे.

मेळघाटातील भवर गावच्या राधा या तीस वर्षीय महिला पाचव्यांदा गर्भवती असताना आपल्या माहेरी गेल्या, शेतात जात असताना महूचे झाड पायावर पडले व त्या अत्यंत गंभीर जखमी झाल्या. ममता यांना कॉल आला की गर्भवती महिला व तिच्या पायावर झाड पडले आहे व ती गंभीर जखमी आहे.

ममता यांनी लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मालवीय यांच्याशी संपर्क करून वाहन चालक गजू भाऊ व आरोग्यसेविका शीतल राऊत यांना लगेच पोहोचण्यास बाबत विनंती केली व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी सदर महिलेला उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे भरती केले परंतु उपचाराची गरज लक्षात घेऊन रात्री बारा वाजता नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित केले गेले. ममता यांनी नागपूरच्या डॉ.सवाई यांना संपर्क करून महिलेला उपचारासाठी मदत करण्याची विनंती केली. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात राधाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे राधा यांना गंभीर अपघातामुळे आपला पाय कामात कायमचा गमवावा लागला, अत्यंत गंभीर इजा झाल्यामुळे डॉक्टरांना निर्णय घेणे भाग पडले.

या गर्भवती महिलेला मदतीसाठी डॉ. मुरारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले, डॉ. श्रीमती वानखेडे, श्रीमती शीतल राऊत, बंडूभाऊ व येथील समुपदेशक मंडळी धावून आले व महिलेला आवश्यक ती मदत केली व गर्भवती महिलेचे प्राण वाचविण्यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरले. आई व गर्भातील बाळ या दोघांना सुखरूप ठेवण्यात यश आले. परंतु महिलेचा पाय गमावल्यामुळे सर्वाना दुःख झाले, परंतु या सर्वांच्या प्रयत्नामुळे मानवतेची ममता एका गर्भवती महिलेचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाली व दोन जीवांचे प्राण वाचले..

सलाम मानवतेच्या कार्याला… सलाम मानवतेला व सलाम ममतेला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *