सार्वजनिक आरोग्य सेवेत दुर्गम भागात सेवा पुरवताना अनेक समस्यांचा वारंवार सामना करावा लागतो व त्या कौशल्याने सोडवाव्या लागतात.
लोकांच्या गरजा आणि परिस्थिती ची मागणी अशा क्रियात्मक धोरणांची निवड करून लोकांच्या सहभागाने व आत्मविश्वासाने आपण आरोग्य सेवा या अधिक समाजाभिमुख करू शकतो. समस्यांचे जाणीवपूर्वक आकलन करून त्यांचे विश्लेषण करून आणि यथायोग्य पद्धतीने उकल केल्याने आपण आरोग्य सेवा दुर्गम भागातही चांगल्या प्रकारे देऊ शकतो.
समस्या सोडविण्यासाठी आपल्याला समस्येचे मूळ स्वरूप लक्षात आले की प्रयत्नांची दिशा सुचते व ती समस्या सोडविण्याची प्रेरणा जागृत होते. सेवा देताना समूह रुपाने कार्य केल्याने लोकांच्या एकत्रित प्रयत्नांनी अधिक लोकाभिमुख करू शकतो.
समूह, विचार – विमर्श, सहभाग, अनुभव सोबत घेऊन सामूहिक कृतीने विशिष्ट दिशेने कार्य केल्यास लोकाभिमुख सेवांची पूर्तता होत. समाजाचा सहभागही त्यास चांगला मिळतो.
कोविड लसीकरण हे #चिखलदरा (Chikhaldara) या अतिदुर्गम भागातील लोकांचे लसीकरण हे तसे आव्हानात्मक कार्य परंतु उपकेंद्रातील डॉ. नीता नागले व त्यांचे पथक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सात गावातील लसीकरण संपूर्णपणे करायचे ठरवले व तसे नियोजन करून येणाऱ्या समस्यांचाही अभ्यास केला. असे लक्षात आले की, दिवसा लोक कामावर जातात व ते संध्याकाळी व सणासुदीच्या दिवसात एकत्र येतात या बाबीवर आपला दृष्टिकोन केंद्रित करून त्यांनी होळीच्या दिवसात रात्रीचे लसीकरण करायचे ठरवले. गावातील आशा अंगणवाडी यांची साथ घेत त्यांनी आपल्या उपकेंद्र गावातील 370 लोकांचे लसीकरण पूर्ण केले.
लोकांच्या मागणीनुसार सेवा दिल्यामुळे लोकांचा सहभागही यात वाढला व त्यांच्याविषयी समाजामध्ये आदराचे स्थान ही प्राप्त झाले.
समुपदेशनासाठी त्यांना आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांची साथ मिळाली त्यांच्या पथकातील प्रवीना धाकडे, आशा सुपरवायझर निगार शेख, आरोग्य सेवक, श्रीकृष्ण ढोणे यांची साथ मिळाली. गावातील आदिवासी भागातील लोकांना त्यांच्या संरक्षणार्थ लसीकरण करण्यासाठी त्यांचे हे सामूहिक कार्य प्रशंसनीय आहे. उपकेंद्र मोथा अंतर्गत आता केवळ 193 लोकांचे लसीकरण बाकी असून या लाभार्थीचाही शोध ही मंडळी घेत आहे. कोणकोणत्या ठिकाणी काम करते आहे व ती गावात कधी येऊ शकेल किंवा असेल त्या ठिकाणी कसे लसीकरण करून घेता येईल याकडेही त्यांचे लक्ष आहे हे विशेष.
या दुर्गम भागात, गावात होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचा दूरदृष्टीने विचार करून व लसीकरणाचा उत्सवही या मंडळींनी घडवून आणला आहे. आणि हो एसटी बसेस व वाहने नसतानाही त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती करून डॉ. आदित्य पाटील यांच्या माध्यमातून वाहनांची ही व्यवस्था केली.
याविषयी मानसेवी वैद्यकिय अधिकारी डॉ. नीता नागले म्हणतात “प्रयत्न केले व लोकांना विश्वासात घेतले तर परिवर्तन घडते लोक आरोग्यसेवा घेण्यास पुढे येतात, मी गेल्या पंधरा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून मला लोकांचा सहभाग मिळतो आहे व सेवेची संधी मिळते आहे याचा मला अभिमान आहे”.
आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करताना व प्रतिबंधात्मक सेवा पुरविताना अशा मंडळींची आरोग्यसेवा ला नक्कीच गरज आहे. अमरावती चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करीत आहोत, अशी ही सर्व मंडळी आवर्जून सांगतात.
परिसर दुर्गम असो वा आव्हानात्मक समूह प्रयत्नाने, जागृतीने व समाजसेवा च्या भावनेने सार्वजनिक आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवेतील या मंडळींचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे असे म्हणावे लागेल.
सार्वजनिक सुटी असताना, दुर्गम भाग असताना आव्हानात्मक परिस्थितीत रात्रीच्या वेळी लसीकरण सेवा पुरविणे हे प्रेरणादायी कार्य आहे या सर्वांचे अभिनंदन……