सामाजिक परिवर्तन सर्व समाजामध्ये व सर्व कालखंडामध्ये घडत असते परंतु त्याचा वेग भौगोलिक परिस्थितीनुरूप बदलतो, कुठे अतिप्रचंड तर कुठे सावकाश असतो. सामाजिक परिवर्तनाची दिशा व वेग ठरविणारे अनेक घटक आहेत त्याचाही परिणाम सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविताना होत असतो… मेळघाटातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी व रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत या अंतर्गत तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात बाईक ॲम्बुलन्स सुरू करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन प्रसंगी पहिल्या एक तासाच्या गोल्डन अवर मध्ये आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने व गंभीर स्वरुपाच्या व तातडीच्या प्रसंगी सेवा देता यावी यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात मोटर बाईक ॲम्बुलन्स उपक्रम सुरू करण्यात आला आहे. टेम्भृ सोंडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पिंपळकर व त्यांच्या टीमला गोल्डन अवर मध्ये चांगली कशी सुविधा देता येऊ शकते याचा अनुभव मिळाला. मेळघाटातील दुर्गम भागात तातडीच्या वेळी सेवा देण्यासाठी या आरोग्य केंद्रातील टीम सतर्कतेने कार्यरत आहे.
मिशन मेळघाट या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या एक दिवस आड भेटी सुरू करण्यात आलेल्या आहेत यावेळी उर्मिला या महिलेस प्रसूती वेदना होत असल्याची माहिती अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना मिळाली त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित कॉल सेंटर वर फोन लावून मदत मागितली परंतु रस्ते अरुंद असल्यामुळे मोठी ॲम्बुलन्स पोहोचणे अवघड होते तेव्हा मोटर बाईक ॲम्बुलन्स द्वारे देविदास येवले यांनी प्रसंगावधान साधत महिलेला गोल्डन अवर मध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली महिलेची रुग्णालयात प्रसूती झाल्यामुळे जोखमीचे प्रसंग टाळता आले.
मेळघाटातील काही भागात अरुंद रस्ते असल्यामुळे मोठी चार चाकी रुग्णवाहिका पोहोचण्यात अडचणी येतात त्यामुळे मोटरबाईक ॲम्बुलन्सचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो व रुग्णालय प्रसूती झाल्यामुळे माता मातेचा धोका टाळला जाऊ शकतो असे डॉ.चंदन पिंपळकर म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती अविशांत पंडा, यांनी एक स्वतंत्र क्रमांक सेवेसाठी उपलब्ध करून दिला असून तातडीने या नंबर वर संपर्क करून रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पहिल्या सुवर्ण तासात म्हणजेच गोल्डन अवर मध्ये रुग्णांना उपचार मिळाल्यास गुंतागुंतीचे प्रसंग टाळता येऊ शकतात याचा हा चांगला सुवर्ण अनुभव म्हणता येईल. मेळघाट सारख्या क्षेत्रात आव्हानात्मक आरोग्य सेवा पुरविताना व व्यवस्थापन करताना अशा सेवांचा लाभ चांगला होऊ शकतो.
प्राथमिक आरोग्य केंद्र टेम्भृसोंडा येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टीमने प्रसंगावधान साधून रुग्णालयीन प्रसुतीसाठी केलेल्या त्यांच्या या आरोग्य सेवा कार्याला आमचा सलाम.