सार्वजनिक आरोग्य सेवेचा प्राण म्हणजे रुग्णांचा कार्य करणाऱ्या घटकांवरील विश्वास व डॉक्टर करीत असलेले प्रामाणिक कार्य होय.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी व रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्यात सार्वजनिक आरोग्य सेवेत गावपातळीवर मानवता व ममतेचा तसेच ऋणानुबंधाचा धागा उत्पन्न होतो आणि खऱ्या अर्थानं रुग्णावर उपचार होतात. आरोग्य सेवेत रुग्णांच्या मनात असलेली श्रद्धा आणि मिळणारे उपचार आपल्याला निश्चितच लाभदायक ठरणार आहे ही अपेक्षाच सार्वजनिक आरोग्य सेवेला अधिक बळकट करीत असते.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना अनेक जिव्हाळ्याचे प्रसंग प्राथमिक व रुग्णालय आरोग्य सेवा प्रदान करताना येत असतात आणि हे अनुभव कधीकधी रक्ताच्या नात्या पेक्षा ही घट्ट आहे की काय ? असा अनुभव मिळतो. विश्वास व प्रामाणिक पणा हा आरोग्य सेवेतील वेदना निवारणासाठी महत्त्वाचा गुण आहे. प्रत्येक रुग्ण डॉक्टरांना काहीतरी शिकवत असतो किंवा प्रसंग त्याला अनुभव म्हणून काही तरी देत असतो व ती एक शास्त्रीय व सामाजिक प्रक्रिया बनते.मानवतेमुळे कठीण प्रसंगी आरोग्य कर्मचारीही रक्ताच्या नात्या इतकेच रुग्णांच्या सोबत असतात.
प्राथमिक आरोग्य केंद्र समुद्रावाडी अंतर्गत ठामनाठाणा गावातील सुषमा या मातेचे हिमोग्लोबीन 6.4 टक्के एवढे होते “ब ” पॉजिटीव्ह रक्तगट असणाऱ्या या गरोदर मातेची जेव्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना सिझेरियन शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अमरावती येथील रुग्णालयात भरती करावे लागेल हे मातेला व नातेवाईकांना सांगितले. परंतु माता, सोबतचे नातेवाईक जाण्यास तयार तयार नव्हते त्यामुळे अडचण निर्माण झाली.
सामद्रावाडीच्या समुपदेशक ममता सोनकर संकटाची चाहूल व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खाजगी दवाखान्यात रक्त उपलब्ध करून देण्याविषयी विनंती केली व दुसऱ्या दिवशी या रक्तगटाचे रक्त आपणास आम्ही परत करू असेही सांगितले परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही, तरी ममतांची जिद्द कायम राहिली आणि त्यांनी डॉ.वानखेडे डॉ. सोहम उघडे वैद्यकीय अधिकारी यांना याची कल्पना देऊन त्यांनीही तत्परता दाखवित परिस्थिती पाहून स्वतः कडील पैसेही दिले. स्वत: समुपदेशक, वाहनचालक व आरोग्य सेवक यांच्या टीमने रक्ताची उपलब्धता करून देण्यासाठी मध्यप्रदेशातील 90 की. मी. खंडवा येथे जाण्याचे ठरवले व त्यांनी रात्री आठ वाजता खंडवा गाठले व रक्ताची दोन बॅग घेऊन पुन्हा ग्रामीण रुग्णालय धारणी गाठले व ग्रामीण रुग्णालयातील डॉ. ठुसे व डॉ. श्रीमती शेंद्रे या डॉक्टरांच्या पथकाने रात्री एक वाजता या महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करून मातेची वेदना पासून मुक्तता केली.
माता व बाळ सुरक्षित आहे, बाळाचे वजन चार किलो असून मातेने सर्व टीमचे आभार मानले आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवेतील ही टीम म्हणजे माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षाही महत्त्वाची ठरली अशी भावना सदर मातेने व्यक्त केली.
जीवन मरणाशी संबंधित व करुणा, विश्वास, दिलासा व ममता यांच्या आधारावर रक्ताच्या नात्या इतकेच भान ठेवून समाजस्वास्थ्य राखणाऱ्या आणि आरोग्य सेवेच्या रक्ताच्या नात्यातील ममता जपणाऱ्या व वेदना पासून मुक्त करणाऱ्या या टीमला व ममतेला सलाम !!