जीवनात व्यवसाय हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. दैनंदिन व्यवहारासाठी व जीवन सुखकर व्हावे यासाठी तसेच आपला गृह प्रपंच चालावा यासाठी जबाबदारीने स्वीकारलेली ही एक जीवन पद्धती आहे. व्यवसायाचे क्षेत्रे ही विविध असली तरी व्यवसाय क्रिया मधून विविध सेवांची देवाणघेवाण होते व त्यामुळे मानवी गरजांची पूर्तता ही होते.
व्यवसायाचा विचार करता व्यक्तीने स्वतःची ध्येय साध्य करून घेण्यासाठी व्यवसायाची जाणीवपूर्वक निवड केलेली असते व ती व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचे साधन बनते आणि ती परिश्रमाने वाढलेली आणि जपलेली एक उदरनिर्वाहाची पद्धत होय. परंतु यामुळे कधी कधी आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना स्वतःची काळजी घेताना मर्यादा येतात व आरोग्य सेवा उपलब्ध असूनही गतिमान व्यवसाय प्रणालीमुळे त्या सेवांचा लाभ लाभार्थींना घेता येत नाही किंवा त्यांना प्राधान्य देता येत नाही.
कोविड लसीकरण मोहीम सर्व देशभर सुरू असताना JSI टीमच्या असे लक्षात आले की वाहन चालक, ड्रायव्हर हा घटक त्यांच्या दूरच्या प्रवासामुळे बाहेर गावी जात असल्यामुळे या घटकाला लसीकरण करून घेणे जमत नाही किंवा दिलेल्या जबाबदारीमुळे मर्यादा येतात किंवा गैरसमजामुळे त्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे या घटकांकडे लक्ष देणेआवश्यक आहे. साथरोग नियंत्रणासाठी सर्वांचे लसीकरण व्हावे या उदात्त हेतूने शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
मागणीनुसार पुरवठा झाल्यास त्याची उपयुक्तता वाढते व ट्रक चालक सारखा घटक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, लसीकरण सुविधा ही त्यांच्या वाटेवरती उपलब्ध नसल्यामुळे त्यांना लसीकरण करून घेण्यात अडचणी निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी प्रयोग म्हणून वडधामना, नागपूर विभागातील भारत पेट्रोल पंपाची लसीकरणासाठी निवड करण्यात आली, त्यासाठी पेट्रोल पंप मालकाचेही मतपरिवर्तन करून सामाजिक जबाबदारी दृष्टीने ते कसे महत्त्वाचे आहे याविषयी बैठकांमध्ये चर्चा झाली व त्यातून पेट्रोल पंप ठिकाणीच वाहनचालकांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले, तसेच या ठिकाणी इंधनासाठी येणारे ट्रक थांबवून लसीकरण कसे महत्त्वाचे आहे याविषयीही वाहनचालकांचे समुपदेशन करून मतपरिवर्तन करण्यात आले.
यासाठी त्या क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने प्रथम एक दिवस सत्र आयोजित करून नंतर पुन्हा तीन दिवस लसीकरणाची सत्र चालू ठेवून 175 पुरुष व 6 महिला यांचे लसीकरण करण्यात आले.
सर्व घटकातील लाभार्थींना त्यांच्या सोयीनुसार पर्याय उपलब्ध करून दिल्यास व लोकसंवाद प्रक्रिया लोकसहभागातून अधिक गतिमान झाल्यास लसीकरणा साठी चांगला प्रतिसाद मिळू शकतो. समाजसेवा या हेतूने आरोग्य सेवा ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे .सर्वांची सुरक्षितता हीच प्रत्येकाची सुरक्षितता असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्याचे लसीकरण झाले आहे किंवा नाही याविषयी सल्लामसलत करून लसीकरण करून घेण्याविषयी त्यांचे मत परिवर्तन करणे आवश्यक आहे किंबहुना ती आपली प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. कारणआपण सुरक्षित.. तर देश सुरक्षित.
सौजन्य: JSI Team Maharashtra