मुंबई, दि. ९ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी व उपजिल्हा रुग्णालयातर्फे खुबा (हिप) आणि गुडघ्याच्या सांधे बदल शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत. राज्यातील विविध दवाखान्यात अशा प्रकारच्या 135 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दवाखान्यात केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केले आहे.
याबाबत डॉ. प्रदीप व्यास म्हणाले, “महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हिंगणघाट, गडचिरोली, भंडारा, औरंगाबाद ,सिव्हिल हॉस्पिटल पुणे यासारख्या ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया गरजू रुग्णांसाठी मोफत केल्या जात आहेत. हिप आणि गुडघ्याच्या समस्या ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक ठरणारी समस्या आहे. याप्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयांमध्ये जास्त खर्च येतो. हा खर्च ग्रामीण गरजू रुग्णांना परवडत नाही. यामुळे रुग्णांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो.
डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, “येत्या वर्षात जिल्हा आणि ग्रामीण ठिकाणी अश्या शत्रक्रिया करण्यासाठी प्राधान्य देऊन हिप व गुडघा सांधे बदल शस्त्रक्रिया उपक्रम बळकट करण्यासाठी प्रयत्न असणार आहेत, जेणेकरून सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामीण आरोग्य सेवांसाठी एक आदर्श राज्य बनू शकेल आणि जास्तीत जास्त गरीब रुग्णांना याचा फायदा होईल.”
वर्धा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस आणि हिंगणघाट येथील सर्जन डॉ. राहुल भोयर, डॉ. आशिष शिंदे यांच्या पथकाने हिप आणि गुडघा सांधे बदल शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. पुण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नियमितपणे शस्त्रक्रिया होत आहेत. गडचिरोली, भंडारा, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यातही उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे म्हणाल्या, ‘आम्ही असंसर्गजन्य आजारांना प्राधान्य देत आहोत आणि सरकारी योजनांतर्गत गरीबांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’
नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ संजय जयस्वाल म्हणाले, “महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गरीब रुग्णांसाठी गडचिरोली, भंडारा, नागपूर वर्धा जिल्हा रुग्णालयात नागपूर विभागात हिप 12 व सांधेबद्ल 04 शस्त्रक्रिया झाल्या. नियमित शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही आरोग्य प्रणाली मजबूत करत आहोत”.
पुण्याचे सहाय्यक संचालक संजय देशमुख म्हणाले, माझ्या आईची गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया पुण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉ. अनिल संतपुरे यांच्या पथकाने यशस्वीपणे केली आहे. त्यामुळे लोकांचा आरोग्य सेवेवरील विश्वास वाढला आहे. ११२ हिप व सात गुडघा सांधेबद्ल शस्त्रक्रिया झाल्या असून नियमितपणे येथे शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.”