परभणी : परभणी महापालिकेच्या अतिक्रमणांचा विळखा आणि अडगळीत पडलेल्या तसेच अनेक दिवसांपासून जुगाराचा अड्डा बनलेल्या ‘राजा-राणी’ या मंगल कार्यालयाचा कायापालट झाला असून, त्याचे रुपांतर आता ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’त झाले आहे. महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर समाजाभिमुख निर्णयामुळे त्यांचे अयोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी कौतुक केले.
“राजा राणी मंगल कार्यालयात रंगला जुगाराचा अड्डा”
राज्य शासनाच्या वतीने शहरी भागात आपला दवाखाना स्थापन करून सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत तृप्ती सांडभोर आयुक्त, महापालिका परभणी यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी निर्णय घ्यायला सुरुवात केली होती. त्यातच १२ नोव्हेंबर २०२२ रोजी एका स्थानिक दैनिकात “राजा राणी मंगल कार्यालयात रंगला जुगाराचा अड्डा” अशा मथळ्याची बातमी झळकली. याविषयी आणखी माहिती घेतली असता त्यांच्या लक्षात आले की, परभणी महानगरपालिकेच्या मालकीचे हे राजा-राणी मंगल कार्यालय १९९५ मध्ये बांधण्यात आले होते. त्यानंतर ते वापरातही होते. परंतु सन २००८ पासून ते विनावापर पडून होते. त्यामुळे या मंगल कार्यालयास अतिक्रमणांचा विळखा पडला. तसेच परिसराला उकिरड्याचे स्वरुप आले होते. ही इमारत अडगळीत पडल्याने जुगाराचा अड्डा म्हणून देखील त्याचा वापर होऊ लागला.
एका निर्णयामुळे अनेक प्रश्न सुटणार
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ नोव्हेंबर २०२२ रोजी येथे सुरु असलेल्या जुगाराच्या अड्डयावर कारवाई केली. त्यानंतर आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी स्वतः त्या इमारतीची पाहणी केली. या इमारतीचा गैरवापर होऊ नये म्हणून तेथे आरोग्य केंद्र बनविण्याचा विचार त्यांच्या मनात आला. कारण या एका निर्णयामुळे अनेक प्रश्न सुटणार होते. एक म्हणजे वास्तूचा गैरवापर टळणार होता. दुसरे म्हणजे शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेली एक इमारत आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध होणार होती. त्यामुळे त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन तेथेच आरोग्यवर्धिनी केंद्र (UHWC) सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दोन महिन्यात त्याचे काम सुरु केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
आता या मंगल कार्यालयाचे रुपांतर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” मध्ये करण्यात येत आहे. या आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, महिन्यातून एका निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा, त्याचप्रमाणे मनपाचे, कोव्हिड केअर सेंटर अशा आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
यामुळे मनपाच्या विनावापर पडून असलेल्या इमारतीचा सुयोग्य विनियोग होईल. तसेच या परिसरातील नागरिकांना ‘आपला दवाखाना’मधील विविध सुविधांचा लाभही घेता येईल.