Menu Close

युवकांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य

महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण

२५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान अभियान

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. २१ : राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आरोग्य सेवा संचालक डॉ अर्चना पाटील उपस्थित होते.

त्यांनी दिलेली माहिती अशी, राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. युवकांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष, विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष उभारण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे.

लस आणि लसीकरणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सुमारे पाच हजार संस्था आहेत. त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठे अशा सर्व संस्थात मिळून सुमारे चाळीस लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना या अभियानाच्या कालावधीत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, या अभियानाच्या नियोजनाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व्हिसीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत मिशन युवा स्वास्थ्यची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

श्री. टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण कर्मचारी आणि लस उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. श्री. सामंत यांनी महाविद्यालयात कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांची माहिती प्राचार्य कडून संकलित केली जाईल, असे सांगितले.

श्री. ठाकरे यांनी महाविद्यालये सुरू झाली असल्याने युवकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लसीकरण झाल्यामुळे युवकांकडून संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल, असे सांगितले.

बैठकीत अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, अभियान संचालक डॉ. सतीश पवार, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. सोनाली रोडे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *