कोविड लसीकरणास गती मिळेल : डॉ. व्यास
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्रातील पालघर जिल्हयाच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोगास आज सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमामुळे राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणास गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशन च्या मदतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये ड्रोन द्वारे लसवाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोचवता येईल. यामुळे शीतसाखळी अबाधित राहील. तसेच प्रवासादरम्यान वाया जाणारे वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपनाकरिता अवयव एका संस्थेतून दुस-या संस्थेत पाठविणे बिना अडथळा व अत्यंत कमी वेळामध्ये सहज शक्य होईल.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून आणि अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हयाच्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपसंचालक, डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद चव्हाण, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील तसेच तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होते.