पुणे – संपूर्ण राज्यभरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे’स आज प्रारंभ करण्यात आला असून या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कात्रज येथे आज सकाळी शासकीय पोलिओ लसीकरण केंद्रावर पाच वर्षाखालील बालकांना राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते पोलिओ डोस देण्यात आला.
पोलिओ मुक्त भारत आज अस्तित्वात असला, तरी भविष्यात देखील आपला देश पोलिओ मुक्तच राहावा यासाठी राज्यातील प्रत्येक ५ वर्षाखालील बालकाला पोलिओ डोस मिळणे गरजेचे असून एक जबाबदार नागरिक व सुजाण पालक या नात्याने प्रत्येकाने यासंबंधी जागरूकता बाळगून बालकांना पोलिओ डोस देणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून पालकांनी पाच वर्षाखालील आपल्या बाळाला पोलिओचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहनही प्रा. डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
कात्रज येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करत उपस्थित बालकांना प्रा. डॉ. सावंत यांनी पोलिओ डोस दिला. त्यामुळे या परिसरात उत्साहात लसीकरणाला प्रारंभ झाला. राज्यभरात उपलब्ध असलेल्या सर्व सरकारी संस्थांमध्ये बालकांचे लसीकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.