Menu Close

आरोग्य भवन, मुंबई येथे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध सरकारी व निम सरकारी कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सेवा आयुक्तालयाचे मुख्यालय असलेल्या मुंबईच्या आरोग्य भवन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. कार्यालयातील विविध प्रशासकीय विभागांमध्ये कर्मचाऱ्यांनी तिरंग्यातील रंग केंद्रस्थानी ठेवून आकर्षक सजावट केली होती. तसेच आरोग्य भवन इमारतीला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ८ वाजता रोजी मुख्यालयात आरोग्य सेवा आयुक्त डॉ रामास्वामी एन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी आरोग्य संचालिका डॉ साधना तायडे, सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, डॉ एकनाथ माले, डॉ गौरी राठोड, सहा संचालक डॉ अरुण यादव, डॉ संजीवकुमार जाधव, डॉ रघुनाथ राठोड, डॉ महेंद्र केंद्रे, डॉ दुर्योधन चव्हाण, डॉ अविनाश भागवत, आरोग्य भवन डिस्पेनसरीच्या डॉ सुचिता फड तसेच आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. ध्वज वंदनानंतर व्यसनमुक्तीची शपथ उपस्थितांना देण्यात आली. यावेळी भारतीय सैन्यदलात सेवा बजावून आरोग्य सेवेत रुजू झालेल्या श्री सुशीलकुमार इंगळे, श्री जगन्नाथ दुधाने, श्री भाऊसाहेब देवकर, श्री समीर माकोने, श्री शरद खरे ह्या माजी सैनिकांचा सन्मान व गौरव करण्यात आला. तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयुक्तालयांतर्गत आयोजित देशभक्तीपर गीत गायन, निबंध स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळादेखील संपन्न झाला.

गायन स्पर्धेत श्रीमती बकुळा शिंदे (प्रथम), विशाल शिरसाठ (द्वितीय), नेहा सावंत (तृतीय), पुष्पलता पारधी (तृतीय), मानसी वाकणकर (उत्तेजनार्थ) यांना व निबंध स्पर्धेत वैभव मोहन पाटील (प्रथम), वनिता परीट (द्वितीय), अश्विनी गवांदे (तृतीय), विद्या मुळीक (उत्तेजनार्थ) यांना तसेच रांगोळी स्पर्धेत सुप्रिया पांढरे (प्रथम), तिलोत्तमा कोळी (द्वितीय), भूमिका रावले (द्वितीय), निकिता कासार (द्वितीय), सुवर्णा वर्तक (तृतीय), वृषाली खडतरे (तृतीय), अमृता भोगले (तृतीय), मीनल काकडे (उत्तेजनार्थ), डॉ गौरी राठोड (उत्तेजनार्थ) यांना आयुक्त डॉ रामास्वामी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वृक्षारोपण उपक्रमदेखील यावेळी करण्यात आला. कार्यालयातील कर्मचारी बकुळा शिंदे यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत आपल्या सुमधुर आवाजात सादर करत उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.

श्री हरिश्चंद्र गायकवाड या कर्मचाऱ्यास कार्यालयातील प्रामाणिक, मेहनती व सर्वांच्या मदतीस सदैव तत्पर कर्मचारी म्हणून गौरवण्यात आले. ध्वजारोहनांतर आयुक्त डॉ रामास्वामी यांनी आपल्या भाषणात आरोग्य सेवेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. आरोग्य हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक असून बदलत्या जीवनशैलीमुळे उदभवणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचा सल्ला दिला. आरोग्य विभागासारख्या एका महत्त्वाच्या विभागात काम करत असताना सार्वजनिक आरोग्य सेवेची विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ज्या स्वातंत्र्यसैनिकांमुळे देशाला परकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळाली त्यांचे स्मरण व वंदन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन डॉ दुर्योधन चव्हाण आणि श्री विजय पोस्तुरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *