Menu Close

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट

प्रा. सावंत यांनी गुलाब पुष्प देऊन केले स्त्री जन्माचे स्वागत

सोलापूर, दि.5 (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी आज पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत आज मुलींना जन्म दिलेल्या दोन मातांचा गुलाबपुष्प देवून सन्मान केला.

यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिक्षक डॉ महेश माने, शिवाजी सावंत आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. डॉ. सावंत यांनी रुग्णालयातील परिचारिका कक्ष, स्त्री आणि पुरुष रुग्ण कक्ष आणि त्यातील स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया, सर्वसाधारण बाह्यरुग्ण, अपघात, मलम पट्टी, तातडीची सेवा, एक्स रे आणि रेकॉर्ड रूम येथे भेट देवून विविध सूचना केल्या. रुग्णांना प्रसन्न वाटावे, यासाठी प्रत्येक विभागाबरोबर रुग्णालय परिसरात स्वच्छता ठेवावी. रुग्णालयात आगीचे प्रकार घडणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोणत्याही बाबतीत रुग्णालयातून पेशंटला इतर ठिकाणी पाठविण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अत्यवस्थ रुग्ण, साप चावलेले रुग्ण यांच्या उपचाराची सोय इथेच व्हावी, याबाबत दक्षता घ्यावी. यासाठी सध्या खाजगी फिजिशियन यांची सेवा रुग्णालयात घ्यावी, यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पोषण आहार प्रदर्शनाची पाहणी


रुग्णालयात स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणासाठी नागरिकांना पोषण आहाराचे महत्व समजावे यासाठी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनातून नागरिकांना स्तनदा माता आणि बालकांच्या आहाराची माहिती देण्यात येत आहे. आहारतज्ञ् अनुराधा वाघमारे यांनी सर्व पदार्थ घरी तयार केले आहेत. या प्रदर्शनाची पाहणी प्रा सावंत यांनी करून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *