Menu Close

सहा वर्षांखालील मुलांवर विशेष लक्ष द्यावे

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई, दि. २५ : गोवर संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्यावी. तसेच जिल्हानिहाय ‘टास्क फोर्स’ स्थापन करुन सहा वर्षांखालील बालकांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले.

यावेळी आरोग्य विभागामार्फत राज्यभरात शहरी तसेच ग्रामीण भागात कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहे, यासंदर्भातील माहिती त्यांनी जाणून घेतली.

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गोवरचे वाढते प्रमाण लक्षात घेता याकडे जास्त लक्ष केंद्रीत करण्यात यावे. आरोग्य विभागातील वेगवेगळ्या टीम तयार करून तात्काळ सर्व्हेक्षण करावे. प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हानिहाय कृती दल कार्यान्वित करावे.

गोवरची संसर्ग जास्त असणाऱ्या भागांमध्ये Vitamin ‘A’ + MR 1 & MR 2 चे डोसेस देण्यात यावेत. त्याचप्रमाणे सर्व परिस्थितीचा दररोज आढावा घ्यावा. उपचार घेत असलेल्या मुलांचे विलगीकरण करणे, कुपोषित मुलांची माहिती घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

गोवर हॉटस्पॉट असलेल्या भागात जास्त लक्ष केंद्रीत करण्यात यावे व गोवर संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासंदर्भातील सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. लसीकरण विषयीच्या जागृतीसाठी विविध धर्मगुरू, स्वयंसेवी संस्था, शिक्षक, राजकीय लोकप्रतिनिधी अश्या विविध माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, भिवंडी, महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *