पुणे – राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयांद्वारे आयोजित विशेष शिबिरांमध्ये युवक आरोग्य कार्यात सहभाग घेणार असून, बाल विवाह रोखण्यासाठी समाजप्रबोधन, गावातील किशोरवयीन मुला-मुलींची अनेमिया (रक्तक्षय) तपासणी तसेच आरोग्य विषयक जनजागृती करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विविध महाविद्यालयांद्वारे सात दिवसीय निवासी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षासाठी केंद्र सरकारकडून निर्गमित करण्यात आलेली थीम ‘माझ्या भारतासाठी युवक’ व ‘डिजिटल साक्षरतेसाठी युवक’ ही आहे.
राष्ट्रीय सेवा योजना संलग्नित विद्यापीठ/संचालनालय अंतर्गत प्रत्येक घटक महाविद्यालयातर्फे वर्षातून एकदा सात दिवसांचे निवासी विशेष शिबीर महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या गावी नोव्हेंबर ते जानेवारी या हिवाळा ऋतूमध्ये आयोजित करण्यात येते. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना २ वर्षामध्ये प्रतिवर्षी १२० तास म्हणजे एकूण २४० तास व दोन्ही वर्षात मिळून एकदा सात दिवसीय निवासी विशेष शिबिर करणे अनिवार्य आहे
दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२०२५ मधील राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत वार्षिक सात दिवसीय विशेष शिबिरांचे आयोजन यावर्षीही १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष शिबिरांमध्ये गाव स्तरावर शोष खड्डे / पाझर खड्डे तयार करणे, बाल विवाह रोखण्यासाठी समाजप्रबोधन करणे, शिबिरातील सहभागी युवकांची तसेच गावातील किशोरवयीन मुला- मुलींची अनेमिया (रक्तक्षय) बाबत तपासणी करणे इत्यादी विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ज्या महाविद्यालयाचे भारत रजिस्ट्रेशन झाले आहे, त्यांनी ‘माय भारत पोर्टल’वर उपक्रमाची माहिती अपलोड कराव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.