मुंबई – ‘निरोगी महाराष्ट्र’चा संकल्प साध्य करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आपल्या घराजवळ सहजसाध्य आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर आरोग्य विभागाचा भर असून त्यादृष्टीने आवश्यक ते प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नाद्वारे विभागाच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्यानंतर आरोग्य विभागाच्या आरोग्य केंद्रांमध्ये गेल्यादोन वर्षांत बाह्य रुग्ण आणि आंतर रुग्ण विभागामध्ये आरोग्य सेवा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
१ कोटीपेक्षा अधिक रुग्णांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ
राज्यातील जनतेला प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सेवा उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, व सामान्य रुग्णालये यांच्यामार्फत पुरविण्यात येतात. विशेष संदर्भीय सेवा जिल्हा रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमार्फत देण्यात येत आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये ऑगस्ट २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान अॅलोपॅथिक आणि आयुष बाह्य रुग्ण विभागात ९ कोटी १२ लाखापेक्षा अधिक बाह्य रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. याच दरम्यान महिन्याला सरासरी ७६ लाखापेक्षा अधिक बाह्य रुग्णांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीत दर महिन्याला सरासरी ४८ लाखापेक्षा अधिक बाह्य रुग्ण लाभार्थ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान ११ कोटी ५९ लाखापेक्षा अधिक बाह्य रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. याच दरम्यान महिन्याला सरासरी ९६ लाखापेक्षा अधिक बाह्य रुग्णांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. २०२२-२३ ते २०२३-२४ या कालावधीत २८ लाखापेक्षा अधिक बाह्य रुग्ण लाभार्थ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. तर ऑगस्ट २०२३ ते जून २०२४ दरम्यान १३ कोटीपेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. या दरम्यान महिन्याला सरासरी १ कोटीपेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला आहे.
आरोग्य केंद्रांमधील बाह्य रुग्ण विभागाप्रमाणेच आंतररुग्ण विभागातही आरोग्य सेवांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये ऑगस्ट २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान अॅलोपॅथिक आणि आयुष आंतर रुग्ण विभागात 39 लाखापेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. या दरम्यान दर महिन्याला सरासरी ३ लाखापेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीत महिन्याला सरासरी ८८ हजारांपेक्षा अधिक आंतर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. ऑगस्ट २०२२ ते जुलै २०२३ दरम्यान ४४ लाखापेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. या दरम्यान महिन्याला सरासरी ३ लाखापेक्षा अधिक रुग्ण लाभार्थ्यांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. २०२२-२३ ते २०२३-२४ दरम्यान महिन्याला सरासरी ४८ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. तर ऑगस्ट २०२३ ते जून २०२४ दरम्यान ४५ लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. या दरम्यान महिन्याला सरासरी ४ लाखापेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
५ प्राथामिक आरोग्य केंद्रामागे एक ग्रामीण रुग्णालय स्थापन
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा तसेच संदर्भ सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आरोग्य संस्था स्थापन करण्यात येतात. संस्था स्थापन करण्याकरिता सन १९९१ जनगणनेच्या ग्रामीण लोकसंख्येच्या आधारे बिगर आदिवासी क्षेत्राकरिता प्रत्येक ३०,००० लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी क्षेत्राकरिता प्रत्येक २०,००० लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र, बिगर आदिवासी क्षेत्राकरिता प्रत्येक ५,००० लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र, आदिवासी क्षेत्राकरिता प्रत्येक ३,००० लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र तर प्रत्येक ४ ते ५ प्राथामिक आरोग्य केंद्रामागे एक ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात येते.
राज्यातील आरोग्य संस्था
१. उपकेंद्रे – १०,७४८
२. प्राथमिक आरोग्य केंद्र – १,९१३
३. आयुर्वेदिक दवाखाने – 462, फिरते आरोग्य पथके – ६६, अॅलोपॅथिक दवाखाने – 92, प्राथमिक आरोग्य पथके – 121, मुफसल दवाखाने – 13, नागरी दवाखाने – 4, जि.प. दवाखाने – 31. युनानी दवाखाने – 25, आश्रमशाळा -37.
४. ग्रामीण रुग्णालये (३० खाटा) – ३६४
५. उपजिल्हा रुग्णालये (५० खाटा) – ६३
६. उपजिल्हा रुग्णालये (१०० खाटा) – ३२
७. सामान्य रुग्णालये – 8
९. इतर रुग्णालये – १
१०. जिल्हा रुग्णालये – १९
११. संदर्भ सेवा रुग्णालये – २
१२. मनोरुग्णालये – ४
१३. स्त्री रुग्णालये – २०
१४. क्षयरोग रुग्णालये – ५
१५. कुष्ठरोग रुग्णालये – २
या आरोग्य संस्थांमध्ये बाह्य आणि आंतर रुग्ण विभागात लाभार्थ्यांना आरोग्य सेवा दिल्या जातात.