मुंबई : मुलांचे लसीकरण वाढवा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी आणि सर्वेक्षण करुन संशयित लक्षणे असणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री श्री. सावंत यांनी मुंबई महापालिकेमार्फत शहरातील काही भागात राबविण्यात येणाऱ्या गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ डॉ. राहुल शिंपी, राज्य साथरोग अधिकारी डॉ प्रदीप आवटे आदी उपस्थित होते.
डॉ.संजीव कुमार यांनी सांगितले की, मुंबई शहरातील आठ वॉर्ड मध्ये मुलांना गोवरची लक्षणं आहेत. या भागात पथकांमार्फत मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. लक्षणे आढळल्यास मुलांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा हजार मुलांचे लसीकरण केले आहे. येत्या काही दिवसांत सुमारे 50 हजारांहून अधिक मुलांना लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे.
यावर श्री. सावंत यांनी सांगितले की, संबंधित आठ वॉर्ड मध्ये विशेष पथकांच्याद्वारे सर्वेक्षण करावे. यासाठी आवश्यक असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाचे मनुष्यबळ पुरविले जाईल. मुंबई बरोबरच गोवरची लक्षणे आढळलेल्या मालेगाव आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका परिसरातही सर्वेक्षण करावे. तेथेही लसीकरण वाढवावे. मुलांचे लसीकरण करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करावे. समुपदेशन करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात यावी.
यावेळी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबई महापालिका राबवत असलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली.