राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या राज्यस्तरीय आरोग्य तपासणी मोहिमेचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे १ मार्च – कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बालकांचे आरोग्य निरोगी राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग त्या दिशेने काम करत आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे राज्यस्तरीय उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे करण्यात आले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम आज पार पडला. पुण्यातील ९ शाळांमधील दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच वेळी राज्यातील तालुका स्तरावरील ३५५ शाळा आणि जिल्हा स्तरावरील ३५ शाळांमध्ये या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. बबिता कमलापूरकर, अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे, डॉ. आर. बी. पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दृकश्राव्य माध्यमातून यावेळी संवाद साधला.
उद्घाटनानंतर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कुटुंबाचे समाजाचे आणि देशाचे उज्वल भवितव्यासाठी बालकांचे आरोग्य निरोगी असणे हे महत्त्वाचे आहे. योग्य वयात योग्य वेळी बालकांना असलेले आजार ओळखता आले आणि त्यावर योग्य वेळेत उपचार झाले तर त्यांचे आयुष्य निरोगी होईल. गरीब आणि गरजू बालकांना आरोग्य सेवा आणि वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग बांधील आहे आणि त्या दिशेने जबाबदारीने पावले टाकत आहे. सशक्त आणि निरोगी आरोग्याची हमी बालकांना देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले की, बालकांचे आरोग्य निरोगी राखण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. आरोग्य विभाग आपली जबाबदारी निश्चित पार पाडेल. राज्याचे मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसांचा कार्यक्रम सर्व विभागांना दिला असून आरोग्य विभागही आपली जबाबदारी पार पाडेल आणि बालकांचे तसेच महिलांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी प्रयत्न करेल.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी समन्वयातून काम काम करणे आवश्यक असून शालेय शिक्षण विभागातर्फे आरोग्य विभागाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील हा एक भाग असून बालकांची आरोग्य तपासणीचे काम आम्ही जबाबदारीने पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली
आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या सूचनेनुसार ही मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी, उपचार, संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग,नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने मोहीम राबविण्यात येणार आहे. आज उद्घाटनाच्या दिवशी तालुका स्तरावरील ३५५ शाळांमध्ये उद्घाटन करण्यात येऊन अंदाजे १,६६,८६६ विद्यार्थ्यांची तर जिल्हा स्तरावरील ३५ शाळांमध्ये उद्घाटन करण्यात येऊन अंदाजे ३३,४०५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी मध्ये आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे. गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा जसे की, औषधोपचार, शस्त्रक्रिया देवून उपचार करणे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे या सेवा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले, तर डॉ. बबिता कमलापूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले