Menu Close

देवघर व काटी गावात (जि.पालघर) मोबाईल मेडीकल युनिट सेवेचा लाभ

Mobile Van

केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सहयोगातुन राज्‍यभरात चालवल्‍या जाणा-या मोबाईल मेडिकल युनिट या उपक्रमांतर्गत राज्‍यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्‍ये ज्‍या ठिकाणी आरोग्‍याच्‍या सेवांपासून लोक वंचित राहतात अशा लोकांपर्यंत आरोग्‍याच्‍या सेवा पोहोचवण्‍यात येत आहेत. हा मोबाईल मेडिकल युनिट हा प्रकल्‍प स्वयंसेवी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून चालविण्‍यात येतो. राज्‍यातील ग्रामीण भागांमध्‍ये आरोग्‍य सेवांपासून वंचित व अर्धवंचित लोकांना प्राथमिक, प्रतिबंधात्‍मक, उपचारात्‍मक आणि संदर्भ आरोग्‍य सेवा त्‍यांच्‍या गावामध्‍ये पुरविणे, अत्‍यावश्‍यक प्राथमिक आरोग्‍य सेवांसह निदानात्‍मक सुविधा पुरविणे, बालमृत्‍यु, माता मृत्‍यु दरात घट, आयुर्मान वृध्‍दी इत्‍यादीसाठी मोबाईल मेडिकल युनिटच्‍या माध्‍यमातून प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍वरुपाच्‍या आरोग्‍य सेवा व संदर्भ सेवा देणे ही उदिदष्‍टे या कार्यक्रमांतर्गत ठेवण्‍यात आलेली आहेत. मोबाईल मेडिकल युनिटव्‍दारे प्राथमिक उपचार, संदर्भसेवा, कुटुंबनियोजन, प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्‍चात माता व बालसंगोपन, मोफ़त औषधी, साथीचे रोग नियंत्रणात्‍मक कार्यक्रम, समुपदेशन, राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमाची अंमलबजावणी, आरोग्‍य व परिसर स्‍वच्‍छता याबाबत लोकजागृती इत्‍यादी कार्यक्रम राबविले जातात. पालघर जिल्हयामध्‍ये मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्‍प कार्यान्वित करण्‍यात आलेला असुन त्‍याअंतर्गत दुर्गम भागातील गावांना भेटी देऊन त्‍यांना आरोग्‍य सेवा देण्‍याचे काम करण्‍यात येत आहेत. त्‍यानुसार दिनांक २३ जून २०२१ रोजी वाडा तालुक्‍यातील देवघर या गावास व दिनांक २४ जून २०२१ रोजी काटी या गावास मोबाईल मेडीकल युनिटने भेट दिली. यावेळी दोन्‍ही गावातील ग्रामस्‍थांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग लाभला. देवघर गावातील एकूण ६५ नागरीकांची यावेळी आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये अॅनीमिया, आर्थिटीस, डोळयांचे विकार, त्‍वचेचे विकार, ताप व इतर आजारांचेर रुग्‍ण आढळुन आले. त्‍यांची तपासणी करण्‍यात येऊन वैदयकीय सल्‍ला व औषधोपचार करण्‍यात आले. तसेच एएनसीच्‍या १० केसेसदेखील तपासणी करण्‍यात आल्‍या. तर काटी गावातील एकूण ५५ नागरीकांची यावेळी आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये तापाचे एकूण ९ रुग्‍ण ज्‍यामध्‍ये 2 लहान मुले,४ पुरुष व ३ महिलांचा समावेश होता. तसेच इतर विविध आजारांचे एकूण २१ रुग्‍ण ज्‍यामध्‍ये १२ लहान मुले व ९ प्रौढ व्‍यक्‍तींचा समावेश होता. तसेच एएनसीच्‍या १० केसेसदेखील तपासणी करण्‍यात आल्‍या. सदर मोबाईल मेडीकल युनिटचे दोन्‍ही गावांतील ग्रामस्‍थांकडून उत्‍स्‍फूर्त स्‍वागत करण्‍यात आले. देवघर येथील भेटीप्रसंगी गावच्‍या उपसरपंच श्रीमती रुचिता मोतिराम पाटील, ग्रामस्‍थ श्री नकुळ गोळे, विनायक पाटील,अंनता पाटील तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्‍या. तसेच काटी गाव येथे गावचे पोलीस पाटील श्री दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्‍य श्री किरण जाधव व इतर ग्रामस्‍थ उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्‍य सेवा दुर्गम खेडेगावामध्‍ये पोहोचण्‍यामध्‍ये येणा-या अडचणींवर मोबाईल मेडीकल युनिटव्‍दारे मात करणे शक्‍य झाले आहे. आरोग्‍याच्‍या किरकोळ तक्रारींसाठी खेडेगावातुन नाक्‍याच्‍या ठिकाणी किंवा आरोग्‍य केंद्रापर्यंत लोकांची होणारी फरफट यामुळे थांबण्‍यास मदत होणार आहे. यासाठी या उपक्रमाची जनजागृती अधिकाधिक प्रमाणात होणे गरजेचे आहे जेणेकरुन जास्‍तीत जास्‍त नागरीक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. शासनाच्‍या आरोग्‍य विभागाने सुरु केलेला सदरील मोबाईल मेडीकल युनिट हा अत्‍यंत स्‍तुत्‍य उपक्रम असुन यामुळे ग्रामीण भागातील आजार व प्रकृतीच्‍या किरकोळ तक्रारी दुर होण्‍यास नक्‍कीच मदत मिळेल अशी आशा आहे.

वैभव पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *