Menu Close

१०७ वर्षांच्या आज्जीबाईनेही केली करोनावर मात मनाची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती चांगली ठेवा -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.३:  करोनाबाधीत रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने करोनावर मात केली आहे, अशी दिलासादायक बातमी देत असताना, मनाची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी असा सल्लाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘करोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत सुरू असलेल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. करोना कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी यावेळी संवाद साधला.

आरोग्यमंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, कोविड केअर सेंटर्स आहेत. त्यामध्ये आवश्यक ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये १०७ वर्षांची महिला, त्यांना ८० वर्षांचा मुलगा आहे व त्यांचा मुलगा जो साधारण ६०-६५ वर्षांचा आहे आणि त्यांची मुलगी असे सर्वजण करोनामधून बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्यामुळे कोरोना बरा होतो मात्र योग्यवेळी उपचारासाठी दवाखान्यात जाणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

करोनाचे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकता

ज्यांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार आहेत त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सामान्य माणसापेक्षा जास्त असते. अशा कोमॉर्बीड अवस्थेतील रुग्णाला करोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तो रुग्ण दगावला तर त्याचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद होते. राज्य शासनाने या संदर्भात पारदर्शकता व प्रामाणिकता याला फार महत्त्व दिले आहे.

दुखणे अंगावर काढू नका

विश्लेषण केले तर २४ तासांतले मृत्यू, ४८ तासांतले मृत्यू यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचे एक कारण आहे कि लोकं दुखणे अंगावर काढतात. लवकर निदान झाले तर त्याचा उपचार तत्काळ करता येतो.

ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करा

प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने तपासणी केली पाहिजे. आपले एसपीओटू (SPO2) (म्हणजेच रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण) पर्सेंटज ९५ च्या खाली गेले तर निश्चितपणे दवाखान्यात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. नागरिकांनी या सगळ्या बाबींना प्रतिसाद देणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोकं राहत असतील किंवा एका घरात १०-१५ लोकं राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही म्हणून त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक अलगीकरण) म्हणतो. ज्यांच्याकडे मोठा फ्लॅट आहे, बंगला आहे, त्यामध्ये बऱ्याच खोल्या आहेत, घरात सगळे सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात आणि स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवत असतील तर त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो.

३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स

होम आयसोलेशनमध्ये बाधीत रुग्णाने एका स्वतंत्र खोलीत राहावे. दुसऱ्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी सगळ्या व्यवस्था स्वतंत्र असायलाच हव्यात. जेणेकरून त्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येणार नाही ही खबरदारी घेतली जाईल. पॉझिटिव्ह रुग्णाला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीसीएचमध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वतःची १०० टक्के काळजी घेऊ शकतात ते लोक, पीपीई किट घालून, फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हज या सगळ्या गोष्टी वापरून घरी काळजी घेऊ शकतात. एकमेकाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तर होम आयसोलेशनने राहणे सुरक्षित आहे. ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोवीड केअर सेंटर्स ठेवण्याची व्यवस्था आहे. महाराष्ट्रात ३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स आहेत. दोन-अडीच लाखांच्यावर खाटा आहेत., असे श्री. टोपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *