कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई – महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असून लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेने काम केले तर महाराष्ट्र निश्चितच कर्करोग मुक्त होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उद्घाटन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज (दि. ४ फेब्रुवारी) झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागामार्फत आजपासून राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान कर्करोगाविषयी व्यापक जनजागृती, तपासणी, निदान आणि उपचार केले जाणार आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका कार्यक्रमाद्वारे या मोहिमेचे उद्घाटन आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव – २ श्री. विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक श्री. अमगोथू श्री रंगा नायक, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदिप गुप्ता, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे व्यासपीठावर उपस्थित होते.
आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, “कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पूर्वी शेतात श्रम करत असलेला माणूस शहरीकरणामुळे श्रम कमी करू लागला. त्याची श्रमाशी नाळ तुटली अन मानवाचे आरोग्य बिघडण्यास सुरवात झाली. अनेक आजार वाढत गेले. त्यात सर्वात भयंकर आजार म्हणजे कर्करोग आजार आहे. त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या कर्करोगावर आज मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. आरोग्य विभागातील ग्रामीण भागातील शेवटचा घटक व मंत्रालयातील सर्वात वरिष्ठ अधिकारी हातात हात घाऊन या आजाराला हद्दपार करण्यासाठी पुढे आला पाहिजे. योग व इतर प्रबोधन कार्यक्रम राबवत संकल्प करत या आजाराला हद्दपार करावे लागणार आहे. व्यसनांमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असून लोकांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी आरोग्य विभागाने तसेच स्वयंसेवी संस्थांनी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. निर्व्यसनी माणसांना होणारा कर्करोग हा अधिक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाई, डॉक्टर्स, कर्मचारी, आआरोग्य सेविका, आशा सेविका यांनी आजपासून श्रद्धेने आणि गतिमान काम केले तर आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र ‘कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ होईल.”
आरोग विभागाचे सचिव श्री. विरेन्द्र सिंह आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “कर्करोगाचे प्रमाण सध्या वाढत आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांमध्ये जागृती, तपासणी, निदान, उपचार आणि त्यांचे पुनर्वसन अशा टप्प्यांमध्ये उपाययोजना करून कर्करोगाशी आपल्याला लढावे लागेल. शाळेपासून ते समाजापर्यंत व्यापक जनजागृती करावी लागेल. हे एका दिवसाचे काम नसून हा रोजचा लढा आहे. त्यामुळे सगळ्यांचे योगदान मोलाचे आहे.”
टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी राज्यातील तसेच देशातील कर्करोगाच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दरवर्षी भारतात १५ लाख कर्करोग रुग्ण आढळतात आणि त्यापैकी सुमारे ८ लाख लोकांचा मृत्यू होतो. येत्या काही वर्षात हे प्रमाण २१ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला कर्करोगाशी लढायला तयार राहावे लागेल. कर्करोगावर योग्य वेळी योग्य उपचार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने जागतिक कर्करोग दिनानिमित्त जी मोहीम सुरु केली आहे ती कौतुकास्पद आहे. देशातही याचे अनुकरण होण्याची गरज आहे.
या कार्यक्रमामध्ये रायगड कर्करोग आरोग्य सेवा माहिती पुस्तिका, तसेच मुख कर्करोग आणि मुख कर्करोग सदृश आजारांचे बाबत माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे कर्करोग जनजागृती, तपासणी, निदान व उपचार सेवांमध्ये उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या आरोग्य सेविका आणि आशा (ठाणे, रायगड), कर्करोग तज्ज्ञ, कर्करोग योद्धे, टाटा मेमोरिअल सेंटर या संस्थेचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक श्री. अमगोथू श्री रंगा नायक यांनी प्रास्ताविक करताना कर्करोग आरोग्य सेवा मोहिमेविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या मोहिमेंतर्गत राज्यातील ३० वर्षावरील नागरिकांची तपासणी, निदान आणि उपचार केले जाणार आहेत. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.