Menu Close

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची होणार सर्वांगीण तपासणी

औंधमधील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय मोहिमेचे उद्घाटन

पुणे – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार राज्यात आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबविण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन शनिवारी (दि. ०१ मार्च) सकाळी ८. ३० वाजता औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांतील 0 ते १८ वयोगटातील बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी, उपचार, संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतच्‍या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्‍या सर्वांगीण आरोग्‍य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग,नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने मोहीम राज्य स्तरावर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या तपासणी मोहिमेची सुरूवात पुण्यातून औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे सकाळी उद्घाटन कार्यक्रमाने होणार आहे. यावेळी शहरातील ९ शाळांमधील बालके व मुलांना आमंत्रित केले आहे. याच वेळी राज्यातील तालुका, जिल्‍हा स्‍तरावरही या मोहिमेचे उद्घाटन करण्‍यात येणार आहे.

या मोहिमेच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे दि. ०१ मार्च रोजी तालुका स्तरावरील ३५५ शाळांमध्ये उद्घाटन करण्यात येऊन अंदाजे १,६६,८६६ विद्यार्थ्यांची तर जिल्हा स्तरावरील ३५ शाळांमध्ये उद्घाटन करण्यात येऊन अंदाजे ३३,४०५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मार्च २०२५ अखेर राज्यातील साधारणतः ६,००० शाळांमधील १४ लाख विद्यार्थी आणि ३०,००० अंगणवाडीतील २० लाख बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिलपासून अंगणवाडीतील बालकांची व जूनपासून शासकीय, निमशासकीय शाळेतील मुलांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल.त्यामध्ये राज्यातील ८५ हजार ७७३ निमशासकीय, शासकीय शाळांमधील १ कोटी २७ लाख मुला-मुलींची तर १ लाख १० हजार अंगणवाडीतील ७१ लाख ८४ हजार बालकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे ० ते १८ वर्षे पर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुलामुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे. आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे. गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा जसे की, औषधोपचार, शस्त्रक्रिया देवून उपचार करणे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे या सेवा पुरविण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या तपासणी पथकामध्ये पुरूष व महिला वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, ए. एन. एम. यांचा समावेश आहे. तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या बालकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करारबध्द रुग्णालय व आरबीएसके करारबद्ध रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे.

बालके व मुलांची ही तपासणी अंगणवाडी, शासकीय शाळांमध्ये करण्यात येईल. यामध्ये बालकांत आढळणारे आजार, व्यंग, जीवनसत्त्वांची कमतरता तसेच किशोरवयीन समस्या त्या अनुषंगाने ही तपासणी होईल. त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील व शहरातील ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) पथकातील महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश आहे. या तपासणीमध्ये ज्या मुलांना उच्च स्तरीय उपचार व शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्यांना जवळील वैद्यकीय महाविद्यालये, मनपा रुग्णालये, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांत संदर्भित करण्यात येतील. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त तथा अमगोथू श्री रंगा नायक, जितेंद्र डूडी (भा.प्र.से) जिल्हाधिकारी पुणे, चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से) विभागीय आयुक्त,पुणे, गजानन पाटील (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पुणे, डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, आरोग्य सेवा,मुंबई, डॉ. स्वप्नील लाळे, संचालक, शहरी आरोग्य सेवा, डॉ. बबिता कमलापूरकर, अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे, डॉ. आर. बी. पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधी या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

*कशी होणार तपासणी ?*-

प्रत्येक बालकाची डोक्यापासून तळपायापर्यंत सविस्तर वैद्यकीय तपासणी.- वजन व उंची घेऊन बॉडी मास इंडेक्स (६ वर्षावरील बालकांमध्ये)- आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचा रक्तदाब, तापमान तपासणी – नवजात बालकांमधील जन्म जात व्यंग ओळखून आवश्यकतेनुसार उपचार- न्यूमोनिया, जंतुसंसर्ग, अतिसार, रक्तक्षय, दृष्टिदोष, दंतविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, ई. व्याधींने आजारी असलेल्या बालकांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार. गलगंड, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, दमा, इपिलेप्सी (फीट येणे) या आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखणे.- ऑटीझम, विकासात्मक विलंब ई. च्या संशयित रुग्णांना ओळखणे- किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक, मानसिक आजार.

*स्थानिक लोकप्रतिनिधीना निमंत्रण*

या कार्यक्रमाला मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, सहकार आणि नागरी उड्‌डाण, भारत सरकार, शरद पवार, राज्यसभा सदस्य, सुनेत्रा पवार, राज्यसभा सदस्य, सुप्रिया सुळे, लोकसभा सदस्य, मा.श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, दत्तात्रय भरणे, मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औ. का.फ., माधुरी मिसाळ, राज्य मंत्री, नगरविकास वैद्यकीय शिक्षण, दादा भुसे, मंत्री, शालेय शिक्षण, आदिती तटकरे, मंत्री, महिला व बालविकास, नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद, मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण, मेधा कुलकर्णी, राज्यसभा सदस्य, डॉ. अमोल कोल्हे, लोकसभा सदस्य, योगेश टिळेकर, विधान परिषद सदस्य, विजय शिवतारे, विधानसभा सदस्य, बापुसाहेब पठारे, विधानसभा सदस्य, सिध्दार्थ शिरोळे, विधानसभा सदस्य, शंकर मांडेकर, विधानसभा सदस्य, अरूण लाड विधान परिषद सदस्य, अमित गोरखे, विधान परिषद सदस्य, महेश लांडगे, विधानसभा सदस्य, सुनिल कांबळे, विधानसभा सदस्य, सुनिल शेळके विधानसभा सदस्य, शंकर जगताप विधानसभा सदस्य, उमा खापरे, विधान परिषद सदस्य, दिलीप वळसे पाटील, विधानसभा सदस्य, राहुल कुल, विधानसभा सदस्य, चेतन तुपे, विधानसभा सदस्य, बाबाजी काळे, विधानसभा सदस्य, जयंत आसगावकर, विधान परिषद सदस्य,भिमराव तापकीर विधानसभा सदस्य, अण्णा बनसोडे विधानसभा सदस्य, शरद सोनवणे विधानसभा सदस्य, हेमंत रासणे विधानसभा सदस्य, ज्ञानेश्वर कटके विधानसभा सदस्य या स्थानिक लोकप्रतिनिधींना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *