Menu Close

रक्त संकलनाच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण राबवणार

रक्त संकलनाच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण राबवणार – प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री

#मुंबई – राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा निर्माण होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये, यासाठी ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ हे धोरण तातडीने तयार करून सादर करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले.

आरोग्य भवन येथे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव श्री. बेंद्रे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीमध्ये बोलताना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन तसेच विविध नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतली जातात. अशा वेळी संकलित होणाऱ्या रक्ताला त्वरित मागणी नसल्यास रक्त वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. त्याउलट, उन्हाळ्यात व सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे रक्ताचा तुटवडाही जाणवतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ असे नवीन धोरण उपयोगाचे ठरणार आहे.