“हरवलेला शिवम… आणि पुन्हा सापडलेलं ‘घर’!”
दहा वर्षांपूर्वीचा तो दिवस…
उत्तराखंडातील एका गावातून शिवम पुरात वाहून गेला ,
परिस्थितीशी झगडत महाराष्ट्रात आल्यावर शिवम, संभाजीनगर मधील वैजापूर येथे मंदिरात पुजारी म्हणून काम करू लागला या काळात मंदिरात चोरी झाली, चोरट्यांनी त्याचे नाव घेतल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला याचा त्याचा मनावर परीणाम झाला, या दरम्यान मानसिक संतुलन बिघडल्याने पोलिसांनी उपचारासाठी त्याला 2021 मध्ये येरवडा मनोरुगणात दाखल केले होते या सर्व आघातात तो सर्वकाही विसरला. नाव, गाव, कुटुंब… अगदी स्वतःचं अस्तित्वही. मानसिक धक्का बसलेल्या शिवमचं आयुष्य पूर्ण बदललं. भान हरपलेल्या अवस्थेत तो महाराष्ट्रात आला जगण्याची ठिकाणेही त्यांने देवाचे घर शोधले पण याही ठिकाणी त्याला वेगळाच अनुभव आला.कोणी ओळख सांगू शकत नव्हतं, त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता… आणि या सगळ्याचा मानसिक ताण त्याच्या आजाराला आणखी वाढवणारा ठरला.
पोलीस त्याला उपचारासाठी येरवडा मनोरुग्णालयात घेऊन आले.उपचार सुरू झाले आणि
तेथे सुरू झाली ‘माणुसकी’ची खरी कथा
चार वर्षांची काळजी, औषधोपचार आणि मायेचा स्पर्श त्याला याच रुग्णालयात मिळू मिळाला.
डॉक्टर, नर्स आणि संपूर्ण पुनर्वसन टीमने शिवमला केवळ रुग्ण म्हणून नाही, तर ‘माणुसकी ’ म्हणून जपलं.
त्याला रोज व्यवस्थित आंघोळ, स्वच्छ कपडे, जेवण दिलं.
संवाद कौशल्य पुन्हा जागं करण्यासाठी सातत्याने काउन्सेलिंग, थेरपी, आणि औषधे दिली गेली.
हळूहळू शिवम बोलायला लागला.
त्याच्या तुटक शब्दांतून टीमने त्याची ओळख जुळवायला सुरुवात केली. त्याचे घर गाव आणि शाळेची माहिती त्यांनी परिचारिका व डॉक्टराना सांगितली ,रुग्णालयाने नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर बेपत्ता असलेले शिवम कुटुंबीयांना परत मिळाले ..रुग्णालयाने त्याच्यावर दाखल झालेला चोरीचा गुन्हा खोटा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन या चोरीच्या गुन्ह्यातूनही त्याला मुक्त होण्यासाठी गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने मागे घेण्यात यशही मिळवले.
रुग्णालयाच्या समाजसेवा अधिक्षक रोहिणी भोसले या त्यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेत होत्या, संवादातून त्यांना त्याच्या गावचे नाव कळाले व त्यांनी गुगल वरून माहिती काढून स्थानिक पोलिसांशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला व त्यानंतर नातेवाईकांशीही संपर्क साधला तेव्हा केदारनाथ येथे अतिवृष्टी मध्ये शिवम वाहून गेले होते व नातेवाईक आणि पोलिसांनी प्रयत्न करूनही ते मिळून आले नाहीत त्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.
आणि अखेर — दहा वर्षांनंतर — त्याच्या मूळ गावाचा धागा सापडला.
जेव्हा रुग्णालयाचे अधिकारी त्याच्या कुटुंबीयांना फोन करून सांगतात,
“तुमचा शिवम सापडला आहे…”
त्या क्षणी तिकडच्या घरात रडणं, हसणं, अविश्वास आणि आनंद — सगळंच एकत्र उसळलं.
कुटुंबीय जेव्हा येरवडा मनोरुग्णालयात पोहोचले…
शिवमचे त्यांना पाहताच डोळे पाणावले.
त्यांनी आपल्या आप्तांना घट्ट मिठी मारली… दहा वर्षांचा वेदनेचा प्रवास एका मिठीत विरघळून गेला.
रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, काउन्सेलर सगळेच या क्षणाचे साक्षीदार होते. माणुसकीचा अर्थ त्यांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
कारण त्यांनीच मृत शिवमला पुन्हा जागृत करून पुन्हा जगायला शिकवलं होतं.
पुरात वाहून जाणे ,मंदिरात आश्रय घेतला असताना चोरीचा गुन्हा दाखल होणे व पुन्हा मानसिक आजारात जाणे व त्यातून मुक्तता होणे, हे तसे अगदी दुर्मिळच आणि हा खरंच पुनर्जन्म नव्हे काय? खरंच त्याच्या साठी मनोरुग्णालय उपचारापेक्षा अधिक ‘उभारी’ देणारं नवजीवन देणार ठिकाण नव्हे काय?
मनोरुग्णालय म्हणजे फक्त औषधे आणि बेड नाहीत.
येथे संवेदना आहे… आधार आहे… माणुसकी जपून कुटुंब शोधण्यासाठी धडपडणारे हात आहेत.
शिवमसारख्या अनेक व्यक्तींना येथे पुन्हा जगण्याची संधी मिळते.
त्यांना पुन्हा नाव मिळतं, ओळख मिळते, आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाचा हात पुन्हा हातात येतो.
रोहिणी भोसले म्हणतात
“आम्ही फक्त उपचार देत नाही… आम्ही मन जोडतो, हरवलेली माणसं पुन्हा घरापर्यंत पोहोचवतो ,आम्ही कर्मचारी असलो तरी आम्ही एक संवेदनशील व्यक्तीही आहोत याची आम्हाला नेहमीच जाणीव आहे. शिवमला नवआयुष्य मिळावं म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून पाठपुरावा करतच राहिलो, त्याचा हा आयुष्याचा प्रवास आम्हाला जीवनाच्या शेवटपर्यंत मानवतेच्या जगण्याची व माणुसकी जागृत ठेवण्याची प्रेरणा नक्कीच देत राहील”
ही कथा केवळ शिवमची नाही,
ही कथा आहे —
माणुसकीची, सेवा-भावाची आणि विश्वासाची.
प्रादेशिक मनोरुग्णालतील
रुग्णालयात दाखल झालेले अनेक स्मृतीच्या अडथळ्यामुळे‘हरवलेले’ आज पुन्हा आपल्या कुटुंबाच्या मिठीत जगत आहेत…
कारण येथे उपचारांसोबत ‘मनाशी मनाचा संवाद’ही चालतो.
येरवडा मनोरुग्णालयातील माणुसकी जपणाऱ्या हातांना सार्वजनिक आरोग्य सेवेचा सलाम.
#शब्दांकन: राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे
