Menu Close

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन साजरा

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन साजरा

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी जि. कोल्हापूर मार्फत आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त (२१ जून) अशोका मल्टीपर्पज हॉल गारगोटी येथे मा. नामदार श्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालक मंत्री, कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीतमध्ये ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमादरम्यान मंत्री महोदयांनी मनोगत व्यक्त करताना ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ हे घोषवाक्य घेवून सर्व नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी योग करणे अत्यंत गरजचे असून शतायुषी होण्यासाठी योग हा सुवर्णमार्ग आहे. त्याचा अवलंब करुन सर्वांनी निरोगी व शतायुषी व्हावे, असा संदेश दिला. योग हा जीवनाच्या सर्व पैलूमधील समतोल साधण्याकरिता करण्यात येणारा एक व्यायाम असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी स्वतः योगाची प्रात्यक्षिके करुन लोकांना नियमित योग धारणा करणेसाठी प्रेरणा दिली. वर्षभर विविध कार्यक्रमाअंतर्गत योगाचा प्रचार व प्रसार करण्याचा दृढनिश्चय केला. सदर कार्यक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक श्री. करवळ यांनी योगासंबंधी मार्गदर्शन करुन योगाची प्रात्यक्षिके करुन घेतली.

कार्यक्रमाच्या वेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा दिनानिमित्त दिलेल्या जागतिक संदेशाचे दृकश्राव्यद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यामध्ये योग संगम कार्यक्रमानिमित्त ६०,६६८ शासकीय निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १,१५८ संस्थांनी सहभाग घेतला. सदरचे २०२५-२०२६ हे वर्ष खालीलप्रमाणे साजरे करण्याचे आयुष मंत्रालयाने आवाहन केले आहे.

१. योग संगम : या कार्यक्रमाद्वारे सामूहिक योग प्रात्यक्षिके करणे
२. योग बंधन : जागतिक देवाणघेवाण कार्यक्रम आणि ज्ञान सत्र
३. योग पार्क : सार्वजनिक उद्यानांना योग पार्क म्हणून अपग्रेड करणे
४. योग समावेश : लहान मुले (३ ते ६ वर्षे), गरोदर स्त्रिया, किशोरवयीन मुले (८ ते १६ वर्षे)
५. योग प्रभाव : गेल्या १० वर्षातील योगाचा भारतीय लोकांच्या आरोग्यावर झालेला प्रभाव
६. योग कनेक्ट : आंतरराष्ट्रीय योगातज्ञ व धोरणकर्ते यांना एकत्रित करणे
७. हरित योग : आईसाठी एक वृक्ष, झाडे लावणे
८. योग अनप्लग्ड : युवकांना आकर्षित करुन डान्स, ड्रामा तसेच योग स्पर्धा घेणे
९. योग महाकुंभ : सलग १ आठवडा योग महोत्सव साजरा करणे
१०. समयोग : आयुष पॅथीमधील आयुर्वेदिक होमिपॅथिक नॅचरोपॅथी युनानी यामध्ये योगाचा समावेश करण्याबाबतची चर्चा व अनुभवाची देवाण-घेवाण करणे

कोल्हापूर जिल्ह्यातील आयुष वैद्यकीय अधिकारी कार्यरत असलेल्या ठिकाणी किशोरवयीन मुलांसाठी योग संस्कार, सदृढ आरोग्यासाठी योग, महिला आरोग्य व योग, वार्धक्य अवस्थेतील योग, बौद्धिक विकास व योग, मानसिक तणाव नियंत्रण व योग या विषयावर शाळा व आरोग्य संस्थामध्ये व्याख्याने घेण्यात येत आहेत.

श्री साताप्पा केणे योग प्रशिक्षण कर्मवीर हिरे महाविद्यालय व श्री शाहूकुमार भवन गारगोटी येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी देखील योग प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी केले व त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी नाथाजी पाटील, मा.डॉ. दिलीप माने, उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, मा. सुप्रिया देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर, मा. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. आनंद वर्धन तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. पल्लवी तारळकर, वैद्यकिय अधिक्षक, डॉ. मिलिंद कदम, वैद्यकिय अधिकारी, तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटी चे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद कदम, वैद्यकीय अधिकारी यांनी मानले