Menu Close

जागतिक स्तनपान सप्ताह उत्सव

स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणे, स्तनपानाचे संरक्षण, प्रोत्साहन आणि समर्थन करणे, जेणेकरून बाळांचे आणि मातांचे आरोग्य सुधारण्यात मदत होईल या उद्देशाने दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह एक जागतिक अभियान म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा सातारा जिल्ह्यात पार पडला. यावर्षीची थीम “आई आणि बाळामधील अंतर कमी करूया: स्तनपानाला समर्थन देऊया” अशी आहे.


सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र, जिल्हा परिषद सातारा, महिला व बालकल्याण विभाग सातारा आणि पाथ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात स्तनपानाच्या योग्य पद्धती, संबंधित गैरसमज, आणि स्तनपानाचे फायदे यावर मार्गदर्शन करण्यात आले. स्तनपानाशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी नाट्यप्रदर्शन सादर केले.


जिल्ह्यात सुरु असलेल्या “मिशन धाराऊ” अंतर्गत अंगणवाडी सेविकांनी प्रदर्शनामार्फत स्तनपान पोषण, मानवी दुधपेढी याबाबत प्रचार केला. कार्यक्रमादरम्यान स्तनपानामध्ये मातेबरोबरच वडील, त्यांचे कुटुंब, आरोग्यसेवा कर्मचारी आणि समाजाकडून स्तनपानाला मिळणाऱ्या समर्थनावर भर दिला गेला.
श्रीमती कमलापूरकर, सहसंचालक, श्रीमती याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा यांनी साताऱ्याच्या समृद्ध इतिहासाचा उल्लेख करून हिरकणीच्या कथेचा संदर्भ दिला आणि स्तनपानासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले. आरोग्य कर्मचारी आणि सामान्य जनतेला या महान कार्याला समर्थन देण्याचे आणि स्तनपान संबंधित निर्देशांक वाढवण्यासाठी आवाहन केले.


जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची माहिती दिली. जिल्ह्यातील गावागावात अशा उपक्रमांना पुढेही चालू ठेवले जाईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी सांगितले. डॉ. राजकुमार जगताप, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कर्मचार्यांना बाळाच्या जन्माच्या एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे आणि ६ महिने केवळ स्तनपानावर भर देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात विशेष नवजात कक्षातील दाखल बालकांच्या मातांचा सत्कार करण्यात आला. केंद्र सरकारने अनुमोदित केलेल्या व जनसामान्यांना उपयोगी पडणाऱ्या पालन १००० या अनुप्रयोगाचा उपयोग व माहिती यावर पाथ प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.


स्तनपानामुळे बाळाला मिळणारे पौष्टिक घटक आणि रोगप्रतिकारक शक्ती यामुळे बाळाचे आरोग्य सुधारते आणि मातेच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक माता आणि कुटुंबांपर्यंत स्तनपानाचे महत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि स्तनपानाच्या फायद्यांची माहिती घेऊन त्याचा प्रचार करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *