Menu Close

‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम करोना लढाईतील प्रभावी अस्त्र

जगभरात करोनाच्या महामारीने आलेल्या संकटावर विजय मिळविण्यासाठी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, व अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा प्रभावी अस्त्र म्हणून वापर महत्त्वाचा ठरणार आहे. करोनाची कडी तोडून समाज सहभागातून लोकांच्या वर्तणुकीत बदलाद्वारे करोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आखलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदरी’ या विशेष मोहिमेद्वारे लोकांची प्राथमिक तपासणी आणि आरोग्य शिक्षण याद्वारे करोना साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व करोनामुक्त महाराष्ट्र यासाठीची ही योजना महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून देशभरात त्याची नोंद घेतली जाईल.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या दूरदर्शी लोकसहभाग मोहिमेला विशेष महत्त्व असून आरोग्य शिक्षणाची ही मोहीम औषधोपचारा इतकीच प्रभावी ठरणार आहे. यामुळे येणारे संभाव्य धोके टळणार असून अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी ही अनमोल अस्त्र ठरणार आहे. आरोग्य संवादाच्या माध्यमातून लोकांनी घ्यावयाची काळजी आणि प्रत्येक कुटुंबात प्रत्येकाची जबाबदारी ओळखून त्या प्रमाणे करोना सोबत जगताना घ्यावयाची खबरदारी याबाबत या मोहिमेत विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर ही मोहीम एक जनआंदोलन रूपात साकारून करोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती एक जबाबदार सैनिक म्हणून उभा राहावा व करोनाची साखळी वेळीच तोडून त्यावर विजय मिळावा यासाठी ही योजना म्हणजे दूरदर्शी व महत्त्वाकांक्षी योजना ठरणार आहे. कारण मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, आणि व्यवहारात आपापसात अंतर ठेवल्याने करोनाची साखळी खंडित होते हे संशोधना अंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त होते.
करोना आजारावर सध्या कोणतीही लस नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपायाद्वारेच यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. या आजाराचे समाजात पसरत असणारे प्रमाण रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग व प्रतिबंधात्मक अनुरूप वर्तन व त्यासाठीचे आरोग्य शिक्षण या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या मोहिमेचे विशेष महत्त्व म्हणजे राज्यातील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण व त्यात आढळून येणारे लक्षणाविषयी त्वरित नोंद होऊन वेळीच काळजी घेतल्याने संभाव्य धोके टळणार आहेत. यात दोन वेळा आरोग्य पथक घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करून वेळीच ‘फिवर’ क्लिनिकद्वारे उपचार केले जाणार आहेत. तसेच आरोग्य शिक्षणाद्वारे संदेश रूपाने घ्यावयाची काळजी बाबतही संवाद साधला जात आहे त्यामुळे वर्तणूक बदल करून करोना आजाराला झिरो करण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ या सारख्या संस्थांनी या मोहिमेत दिले जाणाऱ्या आरोग्य संदेशांना व लोकसहभागाला महत्त्वाचे स्थान असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. किंबहुना असे उपक्रम प्राधान्याने राबविण्यात यावेत यासाठीही पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारनेही करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोविड या आजाराशी अनुरूप व्यवहार करून आरोग्य शिक्षणाद्वारे विशेष काळजी घेऊनच या आजारावर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे असल्याचे सूचित केले आहे व आरोग्य शिक्षणाचे महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. जगातील विविध देशांनीही याच त्रिसूत्री संदेशाचा प्रभावीपणे वापर करून त्या देशातील मृत्युदर कमी करण्यावर भर देऊन या संकटावर विजय मिळवला आहे हे विशेष. या मोहिमेत राज्यातील सर्व घटक सहभागी होऊन प्रत्येकाने याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जबाबदारी स्वीकारून यात सहभागी होऊन ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ हे ब्रीद घेऊन करोना विरुद्धच्या लढ्यात जनआंदोलनाद्वारे सहभाग नोंदवावा व आपण स्वतःची, कुटुंबाची, समाजाची व राज्याची देशाची काळजी घेऊन करोना वर विजय मिळवायचा आहे.

करोना विरुद्धच्या या लढ्यात आरोग्य शिक्षण हेच महत्त्वाचे शस्त्र असून संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने घेतलेली खबरदारी हेच प्रभावी अस्त्र या लढ्यात महत्त्वाचे ठरेल.
आरोग्य शिक्षणाचे महत्त्व साथीच्या आजारावर विजय मिळविण्यासाठी किती महत्त्वाचे असते व लोकसहभाग किती महत्त्वाचा असतो यासाठी एक गोष्ट सांगितली जाते ती अशी. एका विहिरीत एक व्यक्ती पडते आणि ज्याला पोहायला येते ती व्यक्ती त्या व्यक्तीला बाहेर काढते परत दुसरी व्यक्ती पडते परत ती पोहता येणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बाहेर काढते असा क्रम सुरू राहतो शेवटी पोहणाऱ्या व्यक्तीची शक्तीही संपते. या सर्व वाचविण्याच्या कार्यात पोहणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळे जण का विहिरीत पडत आहेत. हे पाहण्यासाठी वेळच मिळत नाही. शेवटी थकल्यावर तो वरती पाहतो तर त्याला लक्षात येते की कोणीतरी राक्षस व्यक्तींना विहिरीत ढकलतो आहे. तेव्हा त्याच्या लक्षात येते की या राक्षसाला मारण्यासाठी आपण प्रयत्न केले असते आणि लोकांच्या सहभागातून त्यालाच ठार केले असते. तर आपण आणखी बऱ्याच लोकांना वाचवू शकलो असतो. मित्रांनो, या साथीच्या आजाराचे असेच आहे या आजाराचा फैलाव कसा होतो व प्रत्येकाने काय काळजी घेतली पाहिजे स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण केले गेले पाहिजे. कोणते नियम पाळले पाहिजे व शासन राबवित असलेल्या उपक्रमांना सहकार्य केले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे.
या गोष्टी प्रमाणेच मास्कचा वापर न करणे, अंतर न पाळणे, हातांची स्वच्छता न ठेवणे यामुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. जबाबदारीने व खबरदारीने आपल्याला ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत सक्रीय सहभागी होऊन करोना (कोविड-19) या राक्षसाचा वध करावयाचा आहे. यात प्रत्येकाचा लोकसहभाग या संकटावर विजय मिळविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. चला आपण विजया दशमीच्या दिवशी करोना या राक्षसाचा वध करूया, सर्वांनी या मोहिमेत जबाबदारीने सहभागी होऊया ही मोहीम यशस्वी होण्यासाठी योगदान देऊया जबाबदार वागणुकीच कर्तव्य पार पाडूया

डॉ. कैलास बाविस्कर,
उपसंचालक आरोग्य सेवा,
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क,
विभाग पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *