Menu Close

आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे आदिवासी महिलेची आरोग्य संस्थेतच प्रसूती

आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कातकरी वाडी येथील एका आदिवासी गरोदर महिलेची प्रसूती आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यास यश आले. ओजीवले गावापासून एक किलोमीटर अंतरावर कातकरवाडी असून हा एक किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची ॲम्बुलन्स ओजीवले गावापर्यंत गेली. तेथून गरोदर महिलेला आणण्यासाठी ॲम्बुलन्समधील स्ट्रेचर पाठविण्यास आले, मात्र महिलेच्या कुटुंबीयांनी याचा वापर न केल्यामुळे ॲम्बुलन्सपर्यंत आणले. त्यानंतर त्या गरोदर मातेस आरोग्य केंद्रास नेऊन प्रसूती करण्यात आली. त्यामुळे माता आणि बाळ सुरक्षित आहेत.

याबाबतची वास्तुस्थितीदर्शक घटना अशी की, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई अंतर्गत ओजीवले गावापासून एक किलोमीटर अंतरावर कातकरीवाडी आहे. येथे एकूण ७ घरे असून लोकसंख्या ४२ एवढी आहे. चित्रा संदीप पवार ही गरोदर माता वांगणी डोणे गाव, ता. अंबरनाथ येथे राहत असून ती कातकरीवाडी येथे माहेरी ४ दिवसांपूर्वी दि. १९/६/२४ रोजी आलेली होती. सदर मातेला गरोदरपणाचा ९वा महिना चालू होता. तिच्या सर्व तपासणी वांगणी येथे तिच्या गावी झालेल्या आहेत. ही माता दि. १९/६/२४ रोजी प्रा. आ. केंद्र, धसई येथे गरोदरपणाच्या तपासणीसाठी आलेली होती. त्यावेळी तिचे हिमोग्लोबिन १०.२ एवढे होते. इतर कोणतेही धोक्याचे लक्षण नव्हते. तिची ही गरोदरपणाची तिसरी खेप होती. पहिली प्रसूती ही ग्रामीण रुग्णालय, मुरबाड येथे झालेली होती. तसेच दुसरी प्रसूती ही वांगणी येथे तिच्या घरी झालेली होती.

दि. २४/६/२४ रोजी तिला सकाळी ५.३० वा. प्रसूतीकळा चालू झाल्या होत्या, परंतु तिच्या कुटुंबीयांनी घरीच प्रसूती करण्याचे ठरविले होते आणि प्रसूती करण्याकरीता त्यांनी एका बाईला बोलावले होते. परंतु ही बाब ओजीवले येथील आशा सेविका नंदा लहु पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरीत प्रा. आ. केंद्र, धसई येथील वैद्यकिय अधिकारी यांना सकाळी ६.३० वा. फोन करून सांगितले व दवाखान्यातील अॅम्ब्युलन्स मागवून घेतली व रुग्णाला प्रसूतीकरीता दवाखान्यात नेण्यासाठी तयार केले. अॅम्ब्युलन्स ही ओजीवले गावातील कातकरीवाडीच्या पक्क्या रस्त्यापर्यंत गेली. मात्र पुढे रस्ता नसल्याने ॲम्बुलन्स तेथेच थांबवावी लागली. त्यांना ॲम्बुलन्समधील स्ट्रेचर गरोदर मातेला आणण्यासाठी दिले .

गरोदर मातेला सकाळी ७.०० वा. प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आणले व तिची प्रसूती सकाळी ७.५६ वा. प्रा. आ. केंद्र, धसई येथील वैद्यकिय अधिकारी यांनी केली. माता व बालक दोन्ही सुरक्षित असून दि. २६/६/२४ रोजी सायं. ४.४५ वा. माता व बालक यांना ॲम्बुलन्सने कातकरीवाडी येथे सोडण्यात आले.

या घटनेमध्ये आशा स्वयंसेविका नंदा लहु पवार आणि आरोग्य विभागाने उत्कृष्ट काम केले व प्रसंगावधान दाखवून प्रसूती घरी न होऊ देता आरोग्य संस्थेमध्ये प्रसूती करवून घेतली, त्यामुळे माता व बालक हे दोन्ही सुरक्षित आहेत.असा खुकसा जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *