Menu Close

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत १४ बालरोग तज्ञांचा समावेश

मुंबई, दि. २७: कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये १३ तज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत.
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूत होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ञांशी संवाद साधून संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत त्यांनी चर्चाही केली केली होती.
लहान मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या टास्क फोर्समध्ये डॉ. विजय येवले, डॉ.बकुल पारेख, डॉ. बेला वर्मा, डॉ. सुधा राव, डॉ. परमानंद अंदनकर, डॉ. विनय जोशी, डॉ. सुषमा सावे, डॉ. जितेंद्र गव्हाणे, डॉ, प्रमोद जोग, डॉ. आरती किन्नीकर, डॉ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. आकाश बंग यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने नुकताच शासन निर्णय जाहिर केला आहे.

अजय जाधव..२७.५.२०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *